Trump and Putin meeting : युक्रेनचे युद्ध संपणार? दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष भेटण्याच्या तयारीत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेन युद्धाच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेटणार आहेत. वॉशिंग्टन आणि मॉस्कोकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अलास्का हे स्थळ रशियाच्या भौगोलिक जवळीकतेमुळे “तर्कसंगत” असल्याचे क्रेमलिनने म्हटले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी कोणत्याही शांतता तोडग्यात युक्रेनचा थेट सहभाग असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. “कोणीही युक्रेनच्या संविधानापासून विचलित होणार नाही. युक्रेनियन आपली जमीन आक्रमकाला देणार नाहीत,” असे झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवरील निवेदनात म्हटले. त्यांनी ट्रम्प आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह “खऱ्या आणि टिकाऊ शांततेसाठी” सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
या बैठकीची घोषणा ट्रम्प यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर झाली, ज्यामध्ये त्यांनी सूचित केले होते की युद्ध समाप्त करण्यासाठी युक्रेनला काही भूभाग सोडावा लागू शकतो. “ही परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. काही भूभाग परत मिळतील, काही बदलले जातील, जे दोघांच्याही फायद्याचे ठरेल,” असे त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले.
एका अधिकृत माहितीनुसार, व्हाईट हाऊस युरोपीय नेत्यांना असा प्रस्ताव मान्य करण्यासाठी पटवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये रशियाला संपूर्ण डोनबास प्रदेश आणि क्रिमियावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळेल, तर सध्या अंशतः व्यापलेले खेरसॉन आणि झापोरीझिया प्रदेश रशिया सोडून देईल. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी अलीकडेच मॉस्कोतील बैठकीत ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांना असा प्रस्ताव दिला होता.
युक्रेन आणि त्याचे युरोपीय सहयोगी असा करार मान्य करतील का, हे अद्याप अस्पष्ट आहे. रशिया सध्या युक्रेनच्या सुमारे 20% भूभागावर ताबा ठेवून आहे, मात्र निर्णायक लष्करी विजय मिळवू शकलेला नाही. युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांनाही फारसा यश आलेले नाही.
यापूर्वी इस्तंबूल येथे झालेल्या युक्रेन–रशिया चर्चांमध्ये प्रगती झाली नाही. मॉस्कोच्या मागण्यांमध्ये युक्रेनने तटस्थ देश बनणे, सैन्य मोठ्या प्रमाणावर कमी करणे, नाटोमध्ये सामील होण्याची आकांक्षा सोडणे आणि पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध उठवणे यांचा समावेश आहे. तसेच, रशियाने अंशतः व्यापलेले दक्षिण-पूर्वेकडील चारही प्रदेश युक्रेनने रिकामे करावेत, अशीही अट आहे.
ट्रम्प मात्र म्हणाले की, “त्रिपक्षीय शांतता करार शक्य आहे. युरोपीय नेते, पुतिन आणि झेलेन्स्की — तिघेही शांतता पाहू इच्छितात.” त्यांनी झेलेन्स्की यांना करारासाठी आवश्यक ते सर्व मिळावे आणि ते तयार व्हावेत, असेही सांगितले.
व्हाईट हाऊसने अलास्का बैठकीची तयारी अजून “लवचिक” असल्याचे सांगितले असून, झेलेन्स्की यांचा यात काही प्रमाणात सहभाग असू शकतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांची शेवटची भेट 2021 मध्ये स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे घेतली होती, तेव्हा जो बायडेन अध्यक्ष होते.