17 दिवसांचा संघर्ष संपला! उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजूर सुखरुप बाहेर
नवी दिल्ली : उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यात अडकलेले कामगार अखेर १७व्या दिवशी बाहेर आले. बचावकार्याला यश आले असून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. बोगद्यातून बाहेर येताच कामगारांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. बचावकार्य यशस्वी झाल्यानंतर कामगारांचे कुटुंबीय, बचाव पथक आणि प्रशासन यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यात आले आणि ड्रिलिंग मशीनच्या मदतीने बोगदा तयार करण्यात आला, ज्यामध्ये 800 मिमी पाईप टाकण्यात आले. या पाईप्सद्वारे एक एक करून कामगारांना बाहेर काढण्यात येत आहे. जे कामगार कमकुवत होते किंवा काही कारणास्तव बाहेर येऊ शकत नव्हते त्यांच्यासाठी स्ट्रेचर बनवले गेले. या मजुरांना स्ट्रेचरवर बसवून दोरीने बाहेर काढण्यात आले.
कामगार बोगद्यातून बाहेर आल्यानंतर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. येथे ४१ रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. बोगद्यातून बाहेर येताच प्राथमिक तपासणीसाठी बोगद्याच्या बाहेर तात्पुरत्या चाचण्या करण्यात आल्या तसेच तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. यासोबतच येथे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्याचा काही भाग अचानक कोसळला होता, त्यात 41 मजूर बोगद्यातच अडकले होते. गेल्या अकरा दिवसांपासून या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. अनेकवेळा यामध्ये काही अडथळे आले, त्यामुळे बचावकार्यात विलंब झाला, मात्र हे सर्व अडथळे दूर झाले आणि अखेर आज प्रशासनाला त्यात यश मिळाले.