इंडिया आघाडीत पुन्हा बिघाडी? आघाडीतील दोन घटक पक्ष भिडले
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीत देशातील २६ राजकीय पक्षांचा समावेश आहे. इंडिया आघाडीची पुढील आणि निर्णायक बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्यापूर्वीच ‘इंडिया’ आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ‘दिल्ली सेवा’विषयक विधेयकावर काँग्रेसने समर्थन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पत्र पाठविले होते. यानंतर लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून आघाडी होईल, असे चित्र रंगविले जात होते. परंतु ‘आप’च्या मंत्री आतिशी यांनी विधानसभा व दिल्ली लोकसभेच्या सातही जागा ‘आप’ लढविणार व या दोन्ही निवडणुकांमध्ये चांगले यश प्राप्त करेन, असा दावा केला आहे. यामुळे दिल्लीत काँग्रेसला पाय ठेवू देण्यास ‘आप’ तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.