मलेशियामध्ये दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेत टक्कर; 10 जणांचा मृत्यू

मलेशियामध्ये दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेत टक्कर; 10 जणांचा मृत्यू

मलेशियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मलेशियाच्या सशस्त्र नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याची माहिती मिळाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मलेशियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मलेशियाच्या सशस्त्र नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याची माहिती मिळाली आहे. यात 10 जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी लुमुत येथील रॉयल मलेशियन नेव्ही तळावर अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर नौदलात शोककळा पसरली आहे. टक्कर इतकी भीषण होती की, दोन्ही विमान खाली कोसळले.

मलेशियाच्या नौदलाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, नौदलाच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त 3 ते 5 मे दरम्यान होणाऱ्या लष्करी परेडसाठी हे हेलिकॉप्टर तालीम करत होते. नौदलाने या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. अपघातात ठार झालेले सर्व हेलिकॉप्टरचे क्रू मेंबर्स होते. मृतदेह ओळखीसाठी लुमुट एअर बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी 9:32 वाजता घडली.

मंगळवारी लुमुट येथील रॉयल मलेशियन नेवी स्टेडियममध्ये हा सराव सुरु असल्याची माहिती समोर आली. जिथं फेनेक एम502-6 आणि एचओएम एम503-3 या दोन हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची बाब समोर आली. यापैकी एक हेलिकॉप्टर स्टेडियमच्या पायऱ्यांपाशी तर, दुसरं तिथं असणाऱ्या एका स्विमिंग पूलमध्ये कोसळलं. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याच्या या घटनांचा वाढता आकडा पाहता मलेशियातील प्रशासनानं यासाठी उच्चस्तरीय आयोगाची स्थापना करण्याचे संकेत दिले असून, आता त्यासाठी चौकशीही सुरु होणार असल्याचं सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com