Nandurbar News : पायाला टिचकी मारली अन् बाळ पुन्हा जिवंत झालं, काय आहे हा नक्की प्रकार?
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. देव तारी त्याला कोण मारी ही म्हण नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सत्यात उतरताना पाहायला मिळाल आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भाग तेलखेडी येथील मिनाबाई पावरा ह्या होळीनिमित्त आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे आल्या होत्या.
त्यावेळेस अचानक बाळाची तब्येत बिघडली. उलट्या करुन बेजार झालेले बाळ दूधही पीत नव्हते, रडता रडता बाळाचा आवाज बंद झाला आणि बाळ निपचित पडले. बाळाचा श्वासोश्वास ही बंद पडला होता. त्यानंतर बाळ मृत झाल्याचा समज करून मिनाबाई पावरा यांच्या सासरी तेलखेडी येथे निरोप पाठवण्यात आला. तेलखेडी व सूर्यपूर येथे रडारड सुरू झाली. अंत्यसंस्काराची तयारी देखील झाली.
तेलखेडीचे आरोग्य अधिकारी डॉ. गणेश तडवी यांनी बाळाला तपासले. त्यावेळेस बाळाच्या हृदयाची गती मंद होती, त्याचे हातपाय पूर्ण थंडगार पडलेले होते त्याचसोबत बाळाचं श्वास देखील बंद झाला होता. डॉक्टर तडवी यांनी आपल्या अनुभवातून बाळाच्या पायाला जोरात टिचकी मारली आणि बाळ लागलीच मोठ्याने श्वास घेऊ लागले. यानंतर बाळाचा श्वास हा सुरळीत झाला आणि बाळ हसू लागले. डॉक्टर गणेश तडवी यांच्या रूपाने देवदूतच भेटण्याची प्रतिक्रिया नागरिकांनी आणि नातेवाईकांनी दिल्याने परिसरात बाळाची आणि जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांची चर्चा संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात होत आहे.