New Courses In ITI : राज्यातील 70 शासकीय ITI संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात
राज्यातील तंत्र शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रात मोठी सुधारणा करत, महाराष्ट्रातील 70 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) दोन नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. यामध्ये Solar Technician (Electric) आणि Electric Vehicle Mechanic (EV Mechanic) या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या निर्णयामुळे काळानुरूप बदलत्या औद्योगिक गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
या अभ्यासक्रमांची शिफारस व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालकांकडे केली होती. ज्याला मंजुरी मिळाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील पर्यावरणपूरक धोरणानुसार सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात कौशल्य असलेल्या तांत्रिक मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. याचा विचार करून हे अभ्यासक्रम सुरू केले जात असून, यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
तसेच, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी चेंबूर येथे एक उच्चस्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली जाणार आहे. या संस्थेत 2025-26 पासून Refrigeration and Air Conditioning Technician, Electrician, Wireman, Internet of Things (IoT) Technician – Smart City, आणि Electric Mechanic हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.
या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून राज्यात कौशल्य विकासाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ITI संस्थांना गुणवत्तेचा ब्रँड बनवण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत असून, खाजगी उद्योगांच्या सहकार्याने राज्यातील 36 जिल्ह्यांतील ITI संस्थांचा दर्जा उंचावला जाणार आहे.
राज्य शासनाच्या दृष्टीकोनानुसार, औद्योगिक आस्थापनांच्या गरजा लक्षात घेऊन अधिक मागणी असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. यामुळे युवकांना रोजगारक्षम बनवून राज्यात आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.