Udayanraje Bhosale On Nitesh Rane : हलाल आणि झटका मटण वादावरुन उदयनराजे भोसले यांनी नितेश राणेंना सुनावलं
हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादाने राजकीयवर्तूळात नवं वळण घेतल आहे. आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी केलं.
मात्र, यावरुन राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. नितेश राणे यांनी केलेल्या हलाल आणि झटका मटण प्रकारामुळे तसेच हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याच्या वक्तव्यामुळे नवा जातीवादी निर्माण होत असल्याच विरोधकांकडून म्हटल जात आहे. तसेच यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. असं असताना नितेश राणे यांच्या वक्तव्यावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या मुस्लिम लोकांकडून मटण खरेदी न करता हिंदू लोकांकडून करा असे वक्तव्य केलं होते. त्याला खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांचा शैलीत उत्तर दिलं आहे. उदयनराजे भोसले म्हणाले की, "मी नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकले नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हिंदू-मुस्लिम असा धर्मभेद नाही केला, त्यांच्यासाठी सर्व धर्म समभाव ही संकल्पना होती. जर महाराजांनी असा भेदभाव केला असता, तर आज आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो".
"नितेश राणेंना असं म्हणायचे असेल औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे ते खोदून काढा असं तर मी किती वेळा तरी सांगितलं आहे. तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो हे विसरू नका त्याचा अर्थ तसा काढू नका. मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं", असा टोला देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.