Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने मागितली जाहीर माफी
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस (OUP) इंडियाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली असून, छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त पुस्तकप्रकरण अखेर दोन दशकांनंतर संपुष्टात आले आहे. अमेरिकन इतिहासकार जेम्स लेन लिखित ‘Shivaji: Hindu King in Islamic India’ या पुस्तकातील काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या विधानांना शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाबाई यांच्याबाबत अपमानास्पद, बदनामीकारक आणि निराधार असल्याचा आरोप करण्यात आला होता.
फेब्रुवारी 2003 च्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. विविध संघटना आणि शिवप्रेमींनी या पुस्तकाविरोधात आंदोलनं केली होती. वाद चिघळल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एका सार्वजनिक सूचनेद्वारे पुस्तकातील काही मजकूर पडताळणी न करता प्रसिद्ध झाल्याचे मान्य केले होते. विशेषतः पृष्ठ क्रमांक 31, 33, 34 आणि 93 वरील मजकुराचा उल्लेख करत प्रेसने त्याबाबत खेद व्यक्त केला होता. त्यानंतर हे पुस्तक भारतातून मागे घेण्यात आले.
दरम्यान, 2005 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित व्यक्तींविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर दीर्घकाळ कायदेशीर लढा सुरू राहिला. जवळपास दोन दशके हा खटला विविध टप्प्यांत प्रलंबित होता. अखेर डिसेंबर 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या प्रकरणावर निर्णय दिला.
न्यायालयाच्या निकालानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाला इंग्रजी तसेच मराठी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध करणे बंधनकारक ठरले. या माफीनाम्यात OUP ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, पुस्तकातील काही विधाने योग्य पडताळणीशिवाय प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे प्रकाशक म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी मागितली आहे.
माफीनाम्यात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, हे पुस्तक भारतात केवळ अत्यंत मर्यादित काळासाठी उपलब्ध होते आणि वादानंतर ते तात्काळ मागे घेण्यात आले होते. या प्रकरणामुळे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत लेखन करताना संशोधन, संवेदनशीलता आणि जबाबदारी किती महत्त्वाची आहे, यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. दोन दशकांनंतर का होईना, पण अखेर या वादाचा कायदेशीर शेवट झाला असून शिवप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा आणि समाधानकारक टप्पा मानला जात आहे.
