"मी आता धक्कापुरुष झालो आहे...", उद्धव ठाकरे यांच्या मिश्किल वक्तव्याची चर्चा
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कुर्ला आणि कलिना येथील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तेथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सद्य परिस्थितिबद्दल भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःला धक्का पुरुष असे संबोधले आहे. त्यांच्या या मिश्किल वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
माझी परिस्थिती जपानसारखी झाली आहे. कारण जपानची आणि माझी अवस्था सारखीच आहे. जपानमध्ये एखादा दिवस भूकंप नाही झाला तर तेथील लोक आश्चर्य व्यक्त करतात. पण आता तसेच रोज धक्के मला मिळत आहे. त्यामुळे आता मी स्वतः धक्कापुरुष झालो आहे. असे धक्के कोण किती देत आहे? ते आपण आता बघूया. पण आपणही असे धक्के देऊया की पुन्हा हे दिसताच कामा नयेत.
ही लढाई केवळ आपल्या एकट्याची नाही. तर आपल्या मुळावर घाव घालणारे हे कसे सरसावले आहेत, आणि आपल्याच लाकडाचा दांडा करुन त्याची कुऱ्हाड बनवून हे शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसाच्या मुळावर घाल घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण एक नाही राहिलो तर त्यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैवं नाही".
घटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस असून सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. 227 किंवा 236 चा निकाल लागेल. एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला जो काही वेळ मिळाला आहे, प्रत्येक शाखेमध्ये आपापली जबाबदारी घ्या. मला खात्री आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत जो अनुभव आला, जी काही चूक झाली असेल ती पुन्हा येणार नाही, तीनही वॉर्ड तुम्ही मला भगवे करुन द्या". असे उद्धव ठाकरे म्हणाले.