Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चातून सरकारवर घणाघात

Uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चातून सरकारवर घणाघात

राज्यात पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी

  • सरकारने ‘पालकत्वाची भूमिका’ घ्यावी?

  • पंतप्रधान आले पण शेतकऱ्यांसाठी काहीच बोलले नाही

राज्यात पूर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. “ज्यांच्यावर संकट आलं, तो शेतकरी समाधानी आहे का?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला. ते पुढे म्हणाले की, “मी स्वतः पाहणी केलीय, आणि तुमच्या माध्यमातून देशानेही ती पाहिली. जमिनी खरडवून गेल्या आहेत, खालचे दगडगोटे वाहून गेलेत, आणि शेतकऱ्याचं आयुष्यही वाहून गेलंय.”

शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी

ठाकरे यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांची किमान मागणी आहे — प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत. मात्र, ही मदत लांबणीवर टाकली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “बँक त्याला कर्ज देईल का? जमीन पूर्ववत करण्यासाठी सरकारने पूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान आले पण शेतकऱ्यांसाठी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान आले, पण त्यांना कल्पना दिलीय की नाही माहित नाही. मात्र, ते इथे येऊन काहीच बोलले नाहीत, हे दुर्दैवी आहे.”

'साडे सहा हजार कोटींचं फसवी पॅकेज'

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “३१ हजार कोटी खूप झाले नाहीत, साडे सहा हजार कोटींचं फसवी पॅकेज ही फक्त घोषणा आहे. ही इतिहासातील सगळ्यात मोठी फसवणूक आहे,” असा आरोप त्यांनी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com