Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे महायुतीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारसभेत इचलकरंजी येथे बोलत होते.
Published by :

मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केला आहे. महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. शिवसेनेनं खांदा देऊन भाजपला महाराष्ट्र दाखवला. नाहीतर त्यांना आता खांदा द्यायला महाराष्ट्रात कुणीच राहिला नसता. तुमची निवडणूक असल्यावर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करुन घेतला. माझी शिवसेनेची निवडणूक असल्यावर पाडा पाडीचे धंदे केले. याचा मी सूड घ्यायला आलो आहे. तुम्ही तुमचं सोनं करुन घेतलं, असं तुम्हाला वाटलं असेल. पण संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. जसा तो धृतराष्ट्र होता, त्याला कौरव काय करत होते, ते कळत नव्हतं, तसा हा धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे मोदी सरकार नव्हे, हे गजनी सरकार आहे. त्यांना काल काय बोललं आहे, ते आज आठवत नाही. २०१४ ला काय बोलले ते २०१९ ला आठवत नाही. २०१९ ला काय बोलले ते २०२४ ला आठवत नाही. उद्या लोक तुम्हाला विसरुन जातील, तुम्ही काळाच्या पडद्याआड जाणार, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे महायुतीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारसभेत इचलकरंजी येथे बोलत होते.

उद्धव ठाकरे मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले, महाराष्ट्र कौरवांच्या बाजूला राहणार नाही, तो सत्याच्याच बाजूला राहणार आहे. मोदी सांगतात, नकली शिवसेना. त्यांनी कुठेही जावं, सर्व ठिकाणी सेनाच सेना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, हे गद्दार आहेतच, पण या गद्दारांचे बाप दोघेजण दिल्लीत बसलेत, ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितलं आहे, इथल्या राज्यपालांनी चुकीचं काम केलं आहे.

मी त्यांना राज्यपाल मानलंच नाही. मी त्यांना कोश्यारी म्हणतो. कारण राज्यपालांचा अपमान मला करायचा नाहीय. ते घटनात्मकपद आहे. पण घटनात्मकपद म्हटल्यावर त्या पदाचा अपमान होऊ न देणं, हे त्या खूर्चीवर बसलेल्या माणसाने बघायला पाहिजे होतं. आमचं सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बोलावलं. अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही.

निवडणूक आयोग यांचा घरगडी आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात, ही नकली शिवसेना आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर मोदी दडपण आणि दबाव आणत आहेत, असा माझा जाहीर आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल द्यायला पाहिजे, हे मोदी सांगणार असतील, तर हुकूमशाही यालाच म्हणतात. इतर कुणीही विकले गेले असतील, पण सर्वोच्च न्यायालय विकलं गेलं नाही. ते यांचे गुलाम झाले नाहीत, याचा मला अभिमान आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com