'भाजपच्या चालीमुळे संभाजीनगरमध्ये गद्दार जिंकला, विधानसभेत गद्दारांना चूड लावणार' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने राज्यात सध्या शिवसंवाद मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर असून आज वैजापूर येथे शिवसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी भाजपा शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे याची उपस्थिती होती. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी भाजपा शिंदे सरकारवर जोरदार टीका करत म्हणाले, राज्यात महिला सुरक्षित नसताना लाडकी बहीण योजनाचे 1500 रूपये पुरतील का? मालवण येथील शिवरायाचा अपमान हा जागतिक सर्वात मोठा अपमान केला आहे. अशा गद्दाराना आता धडा शिकवायचा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मशालीच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे.
संभाजीनगर लोकसभा मतदार संघात आपण हरलो आहे. त्याची रुखरुख मला अजूनही आहे. हा पराभव गद्दारांमुळे झाला. लोकांनी संभाजीनगरात धनुष्यबाणाला मतदान केले. कारण त्यांना वाटले धनुष्यबाण असलेली हीच शिवसेना खरी शिवसेना आहे. कारण त्यांनी बाळासाहेबांचे नावही चोरले होते. त्यामुळे धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे नाव पाहून ते मतदान झाले, परंतु आता घराघरात मशाल पोहचवा. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
महायुतीचे या सरकारकडून राहिलेली देणी मिळत नाहीत. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. शेतकऱ्यांना हक्काचे देत नाही आणि भीक देत आहेत. त्यांची भीक नको. आता त्यांना चलो जाव म्हणण्याची वेळ आली आहे, असा उद्धव ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. १५०० रुपयांत घर चालते का? कोणत्या बहिणीला विचारला, असे ते म्हणाले.