Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

"एक खडा बाजूला गेल्यानं शिवसेनेचा गड ढासळणार नाही", उद्धव ठाकरेंची वायकरांवर टीका

अतिरेक्यांचा हल्ला असो वा अपघात पहिला धावून जातो तो शिवसैनिक - उद्धव ठाकरे
Published by :
Naresh Shende
Published on

शिवसेनेचं हिंदुत्व घरातील चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. धर्म, जात पात बाजूला ठेऊन देश माझा धर्म, हाच आमचा निर्धार आहे. खंडोजी खोपडेची औलाद असेल त्यांनी मिंधेकडे जा, ते सुद्धा गद्दारच आहेत, असं म्हणत ठाकरे यांनी आमदार रविंद्र वायकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. समोर कुणीही असो मला डीपॉझिट जप्त करुन विजय पाहिजे. हा लढा गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा आहे. लोकशाही विरुद्ध हुकमशाही असा हा लढा आहे. अतिरेक्यांचा हल्ला असो वा अपघात पहिला धावून जातो तो शिवसैनिक. एक खडा बाजूला गेल्यानं शिवसेनेचा गड ढासळणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे सरकारसह वायकरांवर टीका केलीय.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईत ठाकरे जनतेशी संवाद साधून शिवसैनिकांच्या मनगटात शिवबंधन बांधत आहेत. आजच्या गोरेगावच्या सभेतही त्यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकेर जनतेला संबोधीत करताना म्हणाले, मी राज्यात फिरतोय, ग्रामिण भागात फिरतोय आणि मुंबईतही फिरतोय. ही माझी सभा नाहीय, मी फक्त माझ्या कुटुंबियांना भेटायला महाराष्ट्रात फिरतोय.

एखाद दुसरा खडा बाजूला केला म्हणजे शिवसेनेचा गड ढासळेल, असं नाहीय. अनेक वर्ष शिवसेनेत राहिलेत त्यांना शिवसेनेची ताकद माहित नाही. तुम्ही लोकांनी मेहनतीने शिवसेनेचा किल्ला अभेद्य ठेवला आहे. भाजप पक्ष आणीबाणीनंतर जन्माला आला. भाजपला काहीच निर्माण करता आलं नाही. म्हणून बाहेरच्या पक्षातली लोक आयात करावी लागत आहेत. आता जय श्रीरामच्या ऐवजी भाजपवाले जय आयाराम म्हणतात.

आमचं हिंतुत्व वेगळं आहे. ज्वलंत आहे. गोरेगावची शाखा रक्तदानासाठी प्रसिद्ध आहे. मुस्लिम लोक मोठ्या संख्येत आपल्यासोबत आले आहेत. ते बोलतात, तुमचा भगवा आणि भाजपच्या भगव्यात फरक आहे. हुकूमशाही गाडून टाकण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. शिवरायांच्या पवित्र भगव्याला ज्यांनी डाग लावलाय त्यांच्या उरावर मला हा भगवा फडकावायचंय. देशभर गद्दारांपेक्षा मूठभर मावळे मजबूत असतात, असं म्हणत ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com