Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray On Amit Shah

"अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकपचा सामना हरला"; उद्धव ठाकरेंनी शहांना दिलं चोख प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांच्या पुत्रीमोहामुळं त्यांचे पक्ष फुटल्याचं शहा म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर दिलं.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतच रणशिंग फुंकलं. यावेळी शहांनी राष्ट्रवादी, शिवसेना फोडण्यात भाजपचा हात नसल्याचं स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांच्या पुत्रीमोहामुळं त्यांचे पक्ष फुटल्याचं शहा म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर दिलं. अमित शहांना मला इतकच सांगायचंय, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. तसं पुत्रप्रेम मी दाखवलेलं नाही. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते, मी पुन्हा येईन. त्यानंतर ते दोन पक्ष फोडून आले, असं म्हणत ठाकरेंनी शहांवर निशाणा साधला.

मविआच्या सभेबाबत बोलताना ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, काँग्रेसच्या काही जागा घोषित करण्याचं बाकी आहे. ते एक दोन दिवसात होईल. आम्ही राज्यासाठी वेगळ्या विषयांसाठी वचननामा घ्यायचा का, कोणते मुद्दे घ्यायचे, ते येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात. अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करु, असं सांगितलं जातं. पण मूळचे प्रश्न सोडवणं दूर राहतं. आणि भलत्याच प्रश्नांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जाते.

ठाकरे पुढे म्हणाले, ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यावर त्यांच्या व्यथा आहेत, त्या एकट्याच्या नाहीत. इथल्या प्रश्नांबाबत अनेक आंदोलने झाली आहे. डबल मालमत्ता कर लावला जातोय. सिडकोकडून कर वसुली केली जाते. महापालिकेकडून कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातो. ही जुलूमशाही आहे. त्याच्याविरोधात २ लाख ८० हजार जनतेनं कित्येक महिने निषेध केला आहे. हा कर जबरदस्तीने वसूल केला जातो. कल्याण-डोंबिवलीतील लोढांच्या पलावा सिटीला करमुक्ती केली आहे. या विषमतेबद्दस तिथले नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत. मुंबई महापालिकेत २०१७ ला निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन दिलं होतं की, ५०० स्केअर फुटापर्यंत ज्यांची मालमत्ता आहे, त्यांना मालमत्ता कर आम्ही रद्द करू आणि तो मी करुन दाखवला.

केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आल्यावर हा दुहेरी कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाहीत. कर भरणार नाही, अशी कुणाची भूमिका नाही. पण या वसुली सरकारने डबल कर आकारून विचित्र कारभार सुरु केला आहे. हा प्रकार आम्ही नक्की थांबवू, असं वचन मी या नागरिकांना देतो. हा मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासून इथे शिवसेनेचं प्राबल्य आहे. संजोग वाघेरेसांरखा लढवय्या उमेदवार पूर्ण ताकदीने तिकडे लढतो आहे. आता पनवेलमध्ये आम्ही मागे राहणार नाही, पण प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चार पावले आम्ही पुढं जाऊ, असा विश्वास आहे. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई सुरु केली आहे, असंही ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com