Ambadas Danve : अंबादास दानवें थेट अजित पवारांच्या लेकावर आरोप, काय म्हणाले दानवे?
थोडक्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा आरोप
राजकीय वर्तुळात खळबळ उडवली
पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचा दावा केला.
(Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. धाराशिव जिल्ह्यातील दौऱ्यात बोलताना दानवे यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचा दावा केला. एवढेच नव्हे, या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दानवे यांनी या व्यवहाराला "प्रशासन व नियमांची सरळ पायमल्ली" असे संबोधले. त्यांनी सांगितले की, संबंधित जमीन सातबारा क्लिअर नसताना आणि मूळ मालकांना विश्वासात न घेता व्यवहार पार पडला. “ही साधी जमीन विकत घेण्याची बाब नाही, तर सत्तेचा वापर करून जमिनीचा मोठा सौदा साधण्यात आला आहे,” असे दानवे यांनी स्पष्ट केले.
'एक लाख भांडवलात 1800 कोटींचा सौदा?'
अंबादास दानवे म्हणाले, “पार्थ पवारांची कंपनी फक्त एक लाख रुपयांच्या भांडवलावर स्थापन झाली आणि ती कंपनी आता कोरेगाव पार्कमध्ये आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभं करण्याची तयारी करत आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आर्थिक सामर्थ्य कुठून आले, याचं उत्तर द्यायला हवं.” दानवे यांनी आरोप केला की, या संपूर्ण व्यवहाराला शासनाकडून विलक्षण गती देण्यात आली. “अवघ्या 48 तासांत स्टँप ड्युटी माफ करण्यात आली आणि केवळ 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाला,” असा दावा त्यांनी केला.
'दादा शेतकऱ्यांना शिकवतात, पण आपल्या मुलांसाठी नियम वाकवतात'
या प्रकरणावरून दानवे यांनी थेट अजित पवारांवरही निशाणा साधला. “अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात की सगळं फुकट लागेल असं वाटतं का? पण आपल्या मुलांसाठी मात्र अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटीत आणि स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये देऊन घेतली जाते. मग हा कोणता नियम?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “राज्यातील परिस्थितीच वेगळी आहे. देवभाऊ म्हणावं की मेवाभाऊ म्हणावं, हेच कळेनासं झालं आहे. मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीनही अजित पवारांचे पुत्र घेत आहेत, दोन दिवसांत जमीन मिळते. शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी मात्र फाईल्स महिनोनमहिने मंत्रालयात अडकतात.”
‘नियम कोणासाठी आणि कुणासाठी नाही?’
दानवे यांनी या प्रकरणात गंभीर शंका उपस्थित करत म्हटलं, “अशी जमीन साधारण नागरिकांना कधीच मिळत नाही. पण पार्थ पवारांसाठी नियमच गुंडाळून ठेवले गेले आहेत. भू संपादन झालेली जमीन परत कशी मिळते? महार वतनाची जमीन खासगी कंपनीला कशी हस्तांतरित होते? हे सगळं लोकांसमोर स्पष्ट केलं पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे पुत्र आहेत. त्यांना विशेष सवलती मिळाल्या असतील, तर त्या कशा आणि कोणत्या अधिकारावर दिल्या, हे जनतेसमोर मांडलं पाहिजे.”
‘राज्याला लुटण्याचा प्रकार सुरू’
दानवे यांनी या संपूर्ण घटनेवरून सरकारवर तीव्र टीका केली. “राज्याला लुटण्याचा प्रकार सुरू आहे. अजित पवार आपल्या राजकीय पदाचा वापर करून कुटुंबीयांच्या फायद्यासाठी नियम वाकवत आहेत. या प्रकरणाचा खुलासा पार्थ पवारांनी स्वतः पुढे येऊन करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, “दादा मंत्रालयातील फाईल्स महिनोमहिने हलत नाहीत, पण पार्थ पवारांची फाईल दोन दिवसांत पुढे सरकते. हा चमत्कार नाही का? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. दानवेंच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधकांनी या विषयावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा आरोप केवळ जमीन घोटाळ्यापुरता मर्यादित न राहता, आगामी निवडणुकांपूर्वी मोठ्या राजकीय वादळाला निमंत्रण देणारा ठरू शकतो, असे संकेत सध्या राजकीय वर्तुळात दिले जात आहेत.

