Uddhav Thackeray
Uddhav ThackerayUddhav Thackeray

Uddhav Thackeray : "ज्याच्या हातात सत्ता...."; बिहार निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकीचा 2025 चा निकाल लागला असून भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(UddhavThackeray ) बिहार विधानसभा निवडणुकीचा 2025 चा निकाल लागला असून भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याउलट, कॉंग्रेस आणि आरजेडीचा मोठा पराभव झाल्याने महाआघाडीत निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली मोठी प्रतिक्रिया नोंदवली.

मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे अनावरण करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि भाजपावर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर असताना ‘शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे’ अशी मागणी करणारे ठाकरे, आता बिहार निकालाच्या अनपेक्षित समीकरणांवर भाष्य करताना दिसले. बिहारमध्ये एनडीए स्वबळावर सत्तेत परतले असले तरी हा निकाल एग्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे त्यांनी नमूद केले.

“जो जिता वही सिकंदर… पण हा सिकंदर कसा बनतो, हे कोणीच समजू शकले नाही”

बिहारच्या विजयावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले,

“मुख्यमंत्री म्हणाले—जो जिता वही सिकंदर! पण सिकंदर कसा बनतो हे राजच कोणालाच समजत नाही. जे जिंकले त्यांचं अभिनंदन. तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी होती, ती खरी होती की एआयने तयार केलेली हे कळायला मार्ग नाही.”

सभांमधील गर्दी आणि निकालाच्या विसंगतीवरून त्यांनी थेट भाजपावर टीका केली.

“ज्यांच्या सभेला खुर्च्या खाली असतात त्यांचं सरकार येतं, आणि जिथे लाखोंची गर्दी असते ते हरणं, हे कोडं कोणत्याच गणिताने सुटत नाही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

मतदार यादीतील नावं वगळण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील त्रुटींवरूनही निवडणूक आयोगाला सवाल केले.

“मतदार यादीतून 65 लाख नावं वगळली होती. ती परत घेतली की नाही हेही स्पष्ट होत नाही. आम्ही यासाठी मोर्चा काढला, दुबार नोंदणी आणि बोगस पत्त्यांविषयी आवाज उठवला. पण निवडणूक आयोग काहीही बोलत नाही. अशा प्रक्रियेला लोकशाही म्हणायचं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले,

“निवडणुका लोकशाहीचा जीव आहे. आमचा निवडणुकीला विरोध नाही. पण प्रक्रियेतील पारदर्शकता नसताना हा निकाल लोकांनी मान्य करावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.”

एनडीएचा विजय आणि मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता

बिहारमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयामुळे आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. “बहुमत आलं तरी अजून नेता निवडता येत नाही,” असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची तुलना बिहारशी केली.

उद्धव ठाकरेंची ही प्रतिक्रिया बिहारच्या राजकीय परिणामांवर त्यांच्या पहिल्या भाष्यामुळे विशेष महत्त्वाची ठरते. सभांच्या गर्दी, एग्झिट पोलच्या भाकितांवरून उलटलेले निकाल, आणि निवडणूक प्रक्रियेमधील पारदर्शकतेवर उठवलेले प्रश्न या सर्वांमुळे भाजपावर त्यांनी अप्रत्यक्ष आणि थेट असे दोन्ही प्रकारचे निशाणे साधले. आता बिहारमध्ये सत्तास्थापनेत काय समीकरणे तयार होणार आणि ठाकरे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा 2025 चा निकाल लागला असून भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे.

  • एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सरकार स्थापन होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

  • बिहारच्या विजयावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया दिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com