Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंनी स्वत:वर आसूड मारावा' ; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूर येथे झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. “उद्धव ठाकरे सत्तेसाठी कोणालाही सोबत घेऊ शकतात. उद्या ते MIM काय, पाकिस्तानलाही सोबत घेऊ शकतील. त्यांनी मुंबईत इतके घोटाळे केले आहेत की, त्यांनी स्वतःवरच आसूड मारावा,” अशी टीका शिंदे यांनी केली.
शिंदे पुढे म्हणाले, “हंबर्डा मोर्चा काढताना चेहऱ्यावर रडू नसून हसू होतं आणि हातात आसूड होता. अशा लोकांकडून सहानुभूती मिळणार नाही. आम्ही विरोधकांच्या आरोपांना कामाच्या जोरावर उत्तर देणार आहोत.”
महापालिका निवडणुकीसाठी शिंदे यांनी "पद एक, उमेदवार एक" हा नियम स्पष्ट केला. कार्यकर्त्यांना महामंडळे, जिल्हा समित्या यामध्ये संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असताना मुंबईतील अनेक विकासकामे मार्गी लावल्याचा दावाही शिंदे यांनी केला. "मुंबईचे काँक्रीटीकरण, रखडलेले प्रकल्प, 'आपला दवाखाना' ही कामे आम्ही हाती घेतली. त्याची पोचपावती आम्हाला विधानसभेत मिळाली, आणि आता ती पालिका निवडणुकीतही मिळेल," असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई हे जागतिक शहर असून, येथे ब्रिटनचे पंतप्रधानही भेट देऊन गेले आहेत. अशा शहराच्या विकासासाठी निर्णयक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे ते म्हणाले.