Uddhav Thackeray : 'काही संधी साधू, संधी मिळताच पळून जातात'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज, शनिवारी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "आयुष्यातील प्रवासात अनेक लोकं भेटतात काही सोबत राहतात. तर काही संधी साधू असतात ते संधी मिळताच पळून जातात. मला अस वाटतंय आज आपल्या सगळ्यांची परिक्षा शिवसेना प्रमुख घेत आहेत. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं. त्यांच्याकडून कोणी काय घेतलं, हे ते बघत आहेत. त्याचचं एक वाक्य आहे की, 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघासारखं जगा. संजय हा असा माणूस आहे. ज्याने पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग असं ठेवलंय. जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाचा स्वर्ग बनवतो. तो काय धाटणीचा असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर जे दिलं, ते मराठी माणसांना, हिंदुंना एक आत्मविश्वास दिला. एक जिद्द दिली. नायतर आज मुंबईत आणि महाराष्ट्रात आपली हालत काय असती, हे वेगळ सांगायची गरज नाही. त्यांनी जे दिल ते घेणारे खरे किती आहेत आणि पळणारे किती आहेत. आज जे स्वर्गात केले आहेत त्याच्या दृष्टीने त्यांना सुद्धा हा कार्यक्रम बघितल्यानंतर हेवा वाटला असेल, आपण सुद्धा इकडे राहिलो असतो."