Uddhav Thackeray On Narendra Modi
Uddhav Thackeray On Narendra Modi

"खरी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची, खरी शिवसेना बाळासाहेबांची, पण..." उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

खरी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची, खरी शिवसेना बाळासाहेबांची. पण या लोकांनी चोरबाजार मांडलाय - उद्धव ठाकरे
Published by :

ज्या मोदींना बाळासाहेबांनी कठीण काळात पाठिंबा दिला होता, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात. पक्ष फोडला. मोदी तुम्ही शिवसेना नाव दिलेलं नव्हतं. ना त्या निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही, माझ्या आजोबा आणि वडिलांनी शिवसेना नाव दिलं आहे. प्रभुरामचंद्रांचा पवित्र धनुष्यबाण आम्ही हाती घेतला होता, तोच धनुष्यबाण आता तुम्ही चोराच्या हातात दिलाय, खरी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची. खरी शिवसेना बाळासाहेबांची, पण या लोकांनी चोरबाजार मांडलाय,असा घणाघात करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मोदी सरकारवर केला आहे. ते यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील जाहीर सभेत बोलत होते.

मोदी सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले, ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेलंल ते या मिंधेला पेलणार आहे. त्यांना त्यांच्या ४० जणांच्या दाढीचं वजन पेलत नाही. हे जागावाटपात उताणे झालेत. यांना काय शिवधनुष्य पेलणार आहे. शिवधनुष्य पेलण्याची ताकद या माझ्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही. आमच्या गावातलं एकसुद्धा मत मोदी सरकारला देणार नाही, शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकूमशाही सरकारला मत देणार नाही. तर तुमचं बोलणं कुठंतरी ऐकलं जाईल आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलो आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखांपर्यंतची पीक कर्जे मी माफ केली होती.

अडीच वर्षात अनेक संकटे आली होती. कोरोनाने हाहाकार माजवला होता. इतर सुद्धा नैसर्गिक आपत्ती आल्या, काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पण केंद्राच्या निकषात बसणारी मदत तुमच्यापर्यंत पोहोचली होती. काँग्रेसने देशाला लुटला असा प्रचार भारतीय जनता पक्ष करतोय, पण सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर एसबीआयने निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयुक्तांकडे दिली आहे. हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला दिले गेले आहेत, असा आरोप ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला आहे.

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला ६-७ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. काँग्रेसच्या खात्यात ६०० ते ७०० कोटी रुपये आले आहेत. आता तुम्हीच सांगा काँग्रेसने देशाला लुटलं की भाजपने लुटलं, तरीसुद्धा आपण भाजपला निवडून देणार? गेल्यावेळी ठीक होतं. पण आता काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. मोंदीचा फोटो लावून ईथे निवडणूक जिंकलेत पण आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावून निवडणूक जिंकणार आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूका आल्यावर ये मेरा परिवार है, चाय पे चर्चा, चहा काय पाण्याचा थेंबही देत नाही. दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यावर तारा टाकल्यात, खिळे टाकल्या, कुंपण लावलं. पण आता तुम्ही शेतकरी मोदी सरकारचा पराभव करा. मोदी सरकारने रस्ते अडवलेत, पुन्हा मोदी सरकार निवडून येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात काटे टाकावे, २९१४ आणि २०१९ ला आम्हीही मोदी मोदी करत आलो, पण त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत वार केला, असंही ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com