Uddhav Thackeray in Marathwada : "वेळ आली तर सरकार ताब्यात घेऊ" शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray in Marathwada : "वेळ आली तर सरकार ताब्यात घेऊ" शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मराठवाडा अतिवृष्टीच्या जखमा अजूनही सुकलेल्या नाहीत, शेतजमिनीत मातीऐवजी खवलं उधडलेलं दिसतं, आणि अशा परिस्थितीत पूर्वी घोषित केलेल्या मदतीचा ठोस परिणाम कुठेच दिसत नाही.
Published by :
Prachi Nate
Published on

मराठवाडा अतिवृष्टीच्या जखमा अजूनही सुकलेल्या नाहीत, शेतजमिनीत मातीऐवजी खवलं उधडलेलं दिसतं, आणि अशा परिस्थितीत पूर्वी घोषित केलेल्या मदतीचा ठोस परिणाम कुठेच दिसत नाही. या जखमी शेतजमिनींची व्यथा समजून घेण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले असता नांदर येथे त्यांनी थेट सरकारवर आणि सत्ताधाऱ्यांवर अत्यंत कठोर शब्दांत प्रहार केला.

ठाकरे म्हणाले की, “शेतकरी पुन्हा उभे राहण्यासाठी नव्या मातीची गरज आहे. मदत देऊ म्हणत सरकारने दिवाळीपूर्वी निधी देण्याचं आश्वासन दिलं, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय आलं? किमान मनरेगातून जाहीर केलेल्या मदतीतून एक लाख तरी द्या असं सांगितलं, तेही नाही. हे सरकार थोतांड आहे.”

शेतकऱ्यांना संघटित होण्याचं आवाहन करताना ते म्हणाले, “तुम्ही जमिनीवरून अंकुर फोडता, तुमच्यात ताकद आहे. पण जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. मी तुमच्यासाठी आलो आहे, मत मागायला नाही. तुमच्या लढ्यात तुमची साथ मागायला आलो आहे.” भाजप नेतृत्वावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “इथे शेतकरी अश्रूंनी माती भिजवतोय आणि तिकडे बिहारमध्ये प्रेमाच्या कथा सांगितल्या जातात. सर्वात जास्त प्रेम बिहारमध्ये म्हणे. महाराष्ट्राचा विसर पडला का? मुख्यमंत्री कुठे आहेत? इथल्या पुरनुकसान पाहायला नाहीत, बिहारमध्ये!”

तसेच बाहेरून मतदान घेऊन जिंकणाऱ्या आमदारांवरही त्यांनी जोरदार टीका केली “लोकांना धोका देऊन जिंकणाऱ्यांनी लाज वाटली पाहिजे. सरकार येतं-जातं, पण आम्ही आणि तुम्ही इथेच. तुमच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी.”

यावेळी सर्वात मोठा दावा करत ठाकरे म्हणाले, “आता वेळ आली तर आपल्याला सरकार ताब्यात घ्यावं लागेल. त्यामुळे एकत्र यावं लागेल. कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, 50 हजार हेक्टरी मदत मिळाली पाहिजे. मिळत नसेल तर दार उघडू नका. त्यांना दाराबाहेरच ठेवा.” पुढे त्यांनी शेतकऱ्यांना सज्ज राहण्याचा संदेश दिला की, “जेव्हा मी हाक देईन तेव्हा रस्त्यावर या. तुमचा न्याय मिळेपर्यंत मी थांबणार नाही.”

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौर्‍यामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत. अतिवृष्टी, पाणीपुरवठा, मातीची कमतरता, आर्थिक पाठबळाचा अभाव या सर्व समस्या त्यांच्या मुख्य भाषणात ठळकपणे समोर आल्या. शेतकऱ्यांचा आवाज बनत ठाकरे यांनी आता आंदोलनाची दिशा दाखवली आहे. पुढील काही दिवसांत या वक्तव्याची राजकीय तापमान वाढवण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com