Uddhav Thackeray : लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं सरकारला ओपन चॅलेंज ?
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत उल्लेख केला. ‘फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर येत्या महिन्यापासून नवीन वर्षापासून बहिणींना २१०० रुपये द्यावेत’, असे ओपन चॅलेंज दिले आहे. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले वाचा…
“लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणारच”
लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणारच. कारण कर्जमुक्तीची थाप त्यांनी मारली होती. २१०० रुपये कधी देणार. फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर येत्या महिन्यापासून नवीन वर्षापासून बहिणींना २१०० रुपये द्यावेत. वर्षभराची भाऊबीज द्यावी. मी लाडक्या बहिणींचा उल्लेखच करणार. त्यांनी जर नाही केली तर बहिणी घरी बसवणार” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे फडणवीस सरकार महापालिका निवडणुकांआधी उद्धव ठाकरे यांचं आव्हान स्वीकारणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सरकारने जर उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं तर लाडक्या बहिणींना नव्या वर्षातच 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होऊ शकते, असा कयास वर्तवला जात आहे.
“हिंदुत्वाच्या मुलामाख्याली पक्षीय अजेंडा राबवू नये”
पुढे ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुलामाख्याली पक्षीय अजेंडा राबवू नये. महाराष्ट्रात त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं आहे. प्रवक्त्याला न्यायमूर्ती नेमलं तर कोणती अपेक्षा करायची. आम्ही फक्त सरन्यायाधीश कोण येणार हेच पाहायचं का. मी त्यांना तेच म्हटलं. कोण होतास तू काय झालास तू. भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलंस तू.
“अमित शाह यांनी मला हिंदुत्व शिकवू नये”
केंद्राला सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. त्यांच्या आणखी काही गोष्टी बाहेर येतील. जीनांच्या थडग्यावर कोणी माथा टेकवला इथपासून ते बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नवाज शरीफांचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबरोबर यांचा मुलगा क्रिकेट खेळतोय तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जातं. कोणत्या टोपी खाली दडतं. जय शाह त्यांचं ऐकत नसेल तर मी हिंदुत्ववादी आहे, जय शाह हिंदुत्ववादी नाही असं अमित शाह यांनी सांगावं. तो पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय. त्याला क्रिकेट बोर्डाचा राजीनामा तरी द्यायला लावा. नाही तर हिंदुत्व तरी स्वीकारावा.
