Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचे नाव न घेत उद्धव ठाकरेंचा निशाणा
थोडक्यात
एकनाथ शिंदेंचे नाव न घेत उद्धव ठाकरेंचा निशाणा
आशुतोष निकाळजे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला
कामे केली तर प्रसिद्धीची गरज नाही – उद्धव ठाकरे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे राज्यात आता वाहू लागले आहेत. अशामध्ये अनेक पक्षांमध्ये पक्षातून बाहेर पडण्याची तसेच पक्षप्रवेशाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे आशुतोष निकाळजे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अशामध्ये शुक्रवारी (10 ऑक्टोबर) मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता यावेळी त्यांनी टीका केली आहे.
ब्रिटेनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा केला. मुंबईत अनेक ठिकाणी यानिमित्ताने त्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग आणि बॅनर्स लावले होते. उद्धव ठाकरे यावर म्हणाले की, “तुम्ही येताना पाहिले असेल की, संपूर्ण परिसर होर्डिंग आणि बॅनरने बरबटून टाकले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते. पण त्यांचे स्वागत आपले उपमुख्यमंत्री करत होते. अरे तिथपर्यंत पोहोचलास तरी का? बोललास तरी का? संजय राऊत म्हणाले की, ब्रिटनच्या पंतप्रधानांची ते बॅनर पाहिले की असे वाटते शिंदे सेनेत प्रवेश केला की काय? काही सांगता येत नाही. कारण, यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे म्हणजे जाहिरातबाजी करण्याचे तसेच स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्याचे वेड लागले आहे.” असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.
कामे केली तर प्रसिद्धीची गरज नाही – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, “शेतकरी तिकडे आक्रोश करत आहे. मोठ्या मुश्किलीने त्याला काहीतरी लबाड पॅकेज देण्यात आले. मी त्याचा उद्याच्या मराठवाड्यातील हंबरडा मोर्चात समाचार घेणारच आहे. पण या सगळ्या मंत्र्यांना स्वतःच्या प्रसिद्धीचे एक वेड लागले आहे. अरे प्रसिद्धीची गरज कामे केली तर लागत नाही. लोकं स्वतःहून तुमचे कौतुक करतात. पण ती कुवत राहिली नाही. त्यामुळे ते अशी पोस्टरबाजी करत आहेत.” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.