Raj Thackeray : युनेस्कोच्या यादीत 11 मराठी किल्ल्यांचा समावेश; राज ठाकरे यांचा सरकारला इशारा
महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या 11 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी याबाबत राज्य सरकारला एक महत्त्वपूर्ण सूचना देत स्पष्ट इशारा दिला आहे की, निकष पाळले नाहीत तर युनेस्को हा दर्जा परत घेतो, हे विसरू नये.
राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना नमूद केलं की, "फक्त दर्जा मिळाला याचा उत्सव साजरा करण्याऐवजी त्यामागची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. ड्रेस्डन व्हॅली (जर्मनी) आणि ओमानमधील आवरिक्स अभयारण्य यांना आधी मिळालेला जागतिक वारसा दर्जा नंतर रद्द करण्यात आला, ही उदाहरणं आपण लक्षात ठेवायला हवीत."
किल्ल्यांचे संवर्धन महत्त्वाचे
ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, सर्व किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवावीत आणि सरकारने कोणताही राजकीय वा धार्मिक पक्ष न पाहता याबाबत कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच, या वारसास्थळांच्या जतनासाठी सरकारने आवश्यक निधी मंजूर करावा आणि युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संवर्धनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे ते म्हणाले.
मराठी वैभवाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद
राज ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे किल्ले केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचा प्रभाव दक्षिण भारतातही होता, याचे दर्शन जिंजी किल्ल्याच्या मान्यतेतून घडते. यामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन संस्कृतींमधील ऐतिहासिक संबंध अधोरेखित होतात.
आर्थिक विकासाच्या संधी
"महाराष्ट्रातील किल्ले आणि किनारपट्टी योग्य प्रकारे विकसित केली, पर्यटनाला चालना दिली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळू शकतो," असं ठाकरेंनी ठामपणे सांगितलं. त्यांनी असा विश्वासही व्यक्त केला की, युनेस्को मानांकनामुळे गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेकडे आता गांभीर्याने लक्ष दिलं जाईल.
जागतिक वारसा यादीतील 12 किल्ले
या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्व संचालनालयामार्फत या यादीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता.