Amit Shah On Operation Mahadev : 'बाटला हाऊसच्या दहशतवाद्यांसाठी अश्रू, शहीद जवानांसाठी नाही?'; अमित शहा यांचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, 29 जुलै रोजी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ल्यांतील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबाबतची सविस्तर माहिती दिली.
Published by :
Team Lokshahi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, 29 जुलै रोजी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ल्यांतील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबाबतची सविस्तर माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन महादेव मिशन अंतर्गत भारतीय सैन्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना ठार मारून हल्ल्याचा बदला घेतला आहे. या निमित्ताने अमित शाह यांनी संसदेत बोलताना विरोधक आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत काँग्रेसवर जोरदार टीका करताना बाटला हाऊस चकमकीचा संदर्भ दिला आणि यूपीए सरकारच्या काळातील दहशतवादविरोधी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेवरही निशाणा साधला.

पहलगाम हल्ल्याप्रकरणी थेट उत्तर

लोकसभेत बोलताना शहा म्हणाले की, “काल काही विरोधक विचारत होते की, पहलगाम हल्लेखोर कुठे गेले? मी स्पष्ट सांगतो, आपल्या सैन्याने त्यांना ठोकलं आहे. जे दहशतवादी तुमच्या काळात लपून बसले होते. आज त्यांचं ठिकाण शोधून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.”

बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख

या पार्श्वभूमीवर शहा यांनी 2008 मधील बाटला हाऊस चकमकीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर भावनिक आणि राजकीय आरोप केला. त्यांनी सांगितलं की, “एक दिवस सकाळी मी नाश्ता करत होतो, तेव्हा मी सलमान खुर्शीद यांना रडताना पाहिलं. मी विचारलं काय झालं? ते म्हणाले, सोनिया गांधी बाटला हाऊसच्या दहशतवाद्यांचे फोटो पाहून रडल्या. जर कुणासाठी अश्रू ढाळायचेच होते, तर पोलीस अधिकारी मोहन शर्मा यांच्यासाठी ढाळायला हवेत, जे त्या चकमकीत शहीद झाले होते.”

शहा यांनी यावेळी दावा केला की, सलमान खुर्शीद यांनी 2012 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ही बाब सार्वजनिकपणे सांगितली होती. “त्यांचं ते भाषण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे,” असंही शहा म्हणाले.

बाटला हाऊस प्रकरण, नेमकं काय घडलं होतं?

13 सप्टेंबर 2008 दिल्लीतील पाच साखळी स्फोटांत सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला.

जबाबदारी : इंडियन मुजाहिदीन या संघटनेने स्फोटांची जबाबदारी स्वीकारली.

19 सप्टेंबर 2008 : दिल्ली पोलिसांनी बाटला हाऊसमधील फ्लॅटवर छापा टाकला.

चकमकीत दोन दहशतवादी आतिफ अमीन व मोहम्मद साजिद ठार, तर पोलीस अधिकारी मोहन शर्मा शहीद झाले

राहुल गांधींना थेट आव्हान

अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट आव्हान देताना विचारलं की, यूपीएच्या काळात दहशतवाद्यांवर नेमकी काय कारवाई झाली होती?

“बैसारन व्हॅलीतील आरोपींना आपल्या लष्कराने ठार केलं आहे. त्यामुळे आता मला काही सांगावं लागत नाही. मी राहुल गांधींना विचारतो. 2004 ते 2014 या दहा वर्षांत जे स्फोट आणि हल्ले झाले, त्यानंतर तुमचं सरकार काय करत होतं?”, असं शहा म्हणाले.

आकडेवारीसह भाजपचा दावा -

यूपीए सरकार (2004–2014) :

दहशतवादी घटना – 7217

नागरिक मृत्यू – 1770

भाजप सरकार (2014–2024):

घटनांमध्ये घट – 70 टक्के

नागरिक मृत्यूत घट – 80 टक्के (फक्त 357 मृत्यू)

शहा यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या “मवाळ” धोरणांचा पुनरुच्चार करत भाजपच्या कडक भूमिकेचा जोरकस प्रचार केला. राहुल गांधींना थेट उत्तर देण्याचे आव्हान देत त्यांनी राजकीय वातावरण तापवलं आहे.

हेही वाचा

Amit Shah On Operation Mahadev : 'बाटला हाऊसच्या दहशतवाद्यांसाठी अश्रू, शहीद जवानांसाठी नाही?'; अमित शहा यांचा काँग्रेसवर घणाघाती हल्ला
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना घोटाळ्यात उपघोटाळा! पुरुषांनंतर 9 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com