Nitin Gadkari : "...तर तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं", नितीन गडकरींनी दिली तिसऱ्या महायुद्धाची शक्यता ?

Nitin Gadkari : "...तर तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं", नितीन गडकरींनी दिली तिसऱ्या महायुद्धाची शक्यता ?

जगभरात तणावाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असून, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

जगभरात तणावाचे आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले असून, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपूरमध्ये ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या स्पष्ट आणि निर्भीड मतांसाठी परिचित असलेल्या गडकरींनी जागतिक घडामोडींवर भाष्य करताना, महासत्तांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे संवाद, प्रेम आणि सौहार्द नष्ट होत असल्याचे म्हटले. गडकरींनी सांगितले की, आजच्या तांत्रिक प्रगतीने युद्धांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

टँक आणि लढाऊ विमानांच्या जागी आता ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी जागा घेतली आहे. अत्याधुनिक शस्त्रांमुळे युद्ध केवळ सीमित भागापुरते मर्यादित न राहता, थेट मानवी वस्त्यांवर हल्ले होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत मानवतेचे रक्षण करणे अधिकच कठीण होत असल्याची तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली. "महासत्तांच्या हुकूमशाही राजवटींमुळे जगभरात अराजकता निर्माण झाली आहे. संवादाचा अभाव, परस्पर सौहार्दाचा लोप आणि युद्धजन्य मानसिकता वाढीस लागली आहे," असे सांगत गडकरींनी जागतिक नेतृत्वाला सवाल केला.

त्यांनी इशारा दिला की, "जर हे असेच सुरू राहिले तर, जग कधीही तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते." गडकरींनी भारताची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे, ज्याने जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश दिला आहे. त्यामुळे युद्ध आणि विनाशाच्या मार्गाऐवजी समन्वयाचा आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

जागतिक संदर्भासोबतच गडकरींनी भारतातील आर्थिक असमानतेवरही भाष्य केलं. "देशात गरीबांची संख्या वाढतेय आणि संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात केंद्रीत होतेय, ही चिंतेची बाब आहे," असे सांगून त्यांनी समृद्धीचं विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला. शेती, उद्योग, कररचना आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) यासारख्या क्षेत्रांमध्ये अधिक समतोल धोरणं राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. "ज्याचं पोट रिकामं आहे, त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही," हा त्यांचा मार्मिक टोला, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेच्या विसंगतींकडे लक्ष वेधणारा ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com