Unmesh Patil : पार्थ पवारांचा उल्लेख करत उन्मेष पाटलांचे गिरीश महाजनांवर खळबळजनक आरोप
थोडक्यात
मंत्री गिरीश महाजन यांनी भूखंड लाटले
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांचा गंभीर आरोप
बारावी नापास असलेला माणूस हजारो कोटींचा मालक कसा झाला?
राजकीय वर्तुळात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. “भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था आणि इतर माध्यमातून गिरीश महाजन यांनी भूखंड लाटले आहेत. भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला तर प्रकार हा फक्त नमुना आहे. सॅम्पल आहे. यामागचं खरं विद्यापीठ म्हणजे बीएचआर आणि इतर माध्यमातून भूखंड लूट करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप उन्मेष पाटील यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
त्याचप्रमाणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही उन्मेष पाटील यांनी जोरदार टीका केली. “मंगेश चव्हाण हा पाठीत खंजीर खुपसणारा नेता आहे. मी आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे त्याचे पहिली दोन उदाहरणे आहेत. आता पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रकरणात त्यांचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे,” असे त्यांनी म्हटले.चाळीसगावातील एमआयडीसी परिसरात शेकडो कोटींच्या गौण खनिज चोरीचा आरोपही त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या गटावर केला. “मी कामांमधून टक्केवारी घेत नाही, पण मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावची लूट चालू आहे. या सर्वांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही लूट यात्रा काढणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी असा सवाल उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला की, “अकरावी-बारावी नापास असलेला माणूस हजारो कोटींचा मालक कसा झाला? हा पैसा मेहनतीने कमावला की जनतेला लुटून?”, असा थेट सवाल त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून केला.
