Maharashtra : राज्यभर पावसाचा जोर; यंदा वेळेच्या आधीच मान्सून धडकल्याने पिकांचे नुकसान
वेळेच्या आधीच तब्बल १२ दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. 25 मे ला मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावत महाराष्ट्र जलमय करून टाकले. मात्र अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आपला शेतकरी वर्ग मात्र यामुळे मोठ्या चिंतेत आहे. त्यांची अवस्था सध्या "ना घर ना घाट का" अशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. आधी अवकाळी पाऊस आणि नंतर वेळेआधीच येऊन धडकलेला मान्सुन यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नेहमी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला आता याच पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या पावसामुळे 29,483 हेक्टर पिकांचे, विशेषतः आंबा, डाळिंब, संत्री, गोड लिंबू आणि भाज्या यांसारख्या बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. राज्यात मान्सून वेळेपूर्वी सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजुनच भर पडली आहे. आंबा, डाळिंब, लिंबू यांसारख्या बागायती पिकांसोबतच बाजरी, मका या पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.
पावसाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. याशिवाय काढणीला आलेल्या गहू, ज्वारी सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांवरही मे महिन्यातील मान्सूनच्या च्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे . विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास झाला आहे पिकाला तीव्र उष्णता आणि नंतर अवकाळी पावसाचा सामना करावा लागला.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण विभागातील बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नसल्याने हे शेतकरीआपली पिके शेतामध्येच साठवून ठेवतात. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची कापणी केलेली पिके तर ओली झालीच मात्र उभ्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाच्या शेवटी आलेल्या या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमध्ये शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसला तो कांदा उत्पादकांना पहिले. अवकाळी पाऊस आणि वेळेआधीच येऊन धडकलेला मान्सूनचा पाऊस यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई पुणे शहरातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये 6 मे पासून सतत पाऊस पडत आहे. धुळे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, अकोला, जालना, बुलढाणा आणि जळगाव येथील शेतकऱ्यांना देखील पावसामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता अवकाळी पाऊस गारपीट आणि दोन दिवसांपूर्वी आलेला मान्सून यामुळे 1 लाख 29 हजार 222 हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रशासनाला नागरिकांना मदत करण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे जे नुकसान झाले आहे त्याचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.