Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का, हजारो कोटी रुपयांची निर्यात धोक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या खूप चर्चेत आहेत. ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून अमेरिकेमध्ये अनेक नवीन नियम लागू केले आहेत. तसेच निर्बंधदेखील घातले आहेत. अशातच आता ट्रम्प यांनी अमेरिकेतील स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर 50% कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर, स्थानिक उत्पादनावर, किंमतींवर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या 39 हजार कोटींच्या उत्पादनांना फटका बसण्याची शक्यता आहे.
खासकरुन ऑटोमोबाईल्स, ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर येणाऱ्या काळात अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापार परिस्थिती बदलू शकते, ज्यामुळे भारतासह अनेक देशांच्या निर्यातदारांना नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.अमेरिका ही भारतासाठी एक महत्त्वाची निर्यात बाजारपेठ आहे. स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर 50% कर लादल्याने भारताकडून अमेरिकेला होणारी निर्यात कमी होऊ शकते.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या आकडेवारीनुसार, भारताने आर्थिक वर्ष 25 मध्ये अमेरिकेला सुमारे $4.56 अब्ज किमतीचे स्टील, अॅल्युमिनियम आणि संबंधित उत्पादने निर्यात केलेली. यात लोह आणि स्टील उत्पादनांची निर्यात $587.5 दशलक्ष, लोह किंवा स्टील वस्तूंची निर्यात $3.1 अब्ज, अॅल्युमिनियम आणि संबंधित वस्तूंची निर्यात $860 दशलक्ष इतकी आहे. यातील बहुतांशी उत्पादने ही महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू येथील आहेत.