Donald Trump On Ind-Pak War : "एक, दोन नव्हे तर तब्बल इतके विमान..."; भारत-पाकिस्तान संघर्षात ट्रम्प यांचा हस्तक्षेप, 'त्या' वक्तव्यानंतर नवीन वाद निर्माण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत नवा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, या संघर्षादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांची सात लढाऊ विमानं पाडली होती आणि ते अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. मात्र, त्यांच्या हस्तक्षेपामुळे युद्ध रोखले गेले, असा दावा त्यांनी केला आहे.
ट्रम्प यांचा हा दावा नवीन नाही. याआधीही त्यांनी वारंवार सांगितले आहे की भारत-पाकिस्तान संघर्ष त्यांच्यामुळे थांबला. कधी पाच विमानं, कधी सहा विमानं पाडल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी सात विमानं पाडल्याचा दावा करत पुन्हा चर्चेला उधाण आणलं आहे. मात्र, त्यांच्या प्रत्येक दाव्यातील आकडेवारी वेगवेगळी असल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारतीय हवाई दलाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं आणि एक AEW&C विमान भारतीय पायलटांनी पाडलं होतं. म्हणजेच एकूण सहा विमानं नष्ट झाली होती. ट्रम्प यांनी केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत हे वेगळं आहे.
भारत सरकारने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की संघर्ष रोखण्यासाठी कुठल्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी झाली नाही. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष चर्चा होऊन युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतही सांगितले होते की भारत-पाकिस्तान संघर्ष हा दोन्ही देशांचा निर्णय होता आणि बाहेरील कोणत्याही देशाचा त्यात सहभाग नव्हता.