Uttar Pradesh Rain : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस; अनेक घरे पाण्याखाली
(Uttar Pradesh Rain) उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण प्रयागराज जिल्ह्यात पुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे एक मीटरपेक्षा अधिक पातळीवर नद्या वाहत असून 10 हजारांहून अधिक घरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. सदर, करछना, फूलपूर, सोरांव, हंडिया आणि बारा या तालुक्यांतील गावे थेट पुराच्या तडाख्यात आली आहेत.
पाण्याखाली गेलेल्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस व प्रशासनाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.अनेक नागरिक स्वतःच सुरक्षित भागात किंवा नातेवाईकांकडे स्थलांतर करत असल्याचे दिसून येत आहे.
फाफामऊ आणि छतनाग येथे गंगा नदीची पातळी 85.77 मीटर आणि 85.05 मीटर नोंदवली गेली आहे, तर नैनी येथे यमुनेची पातळी 85.78 मीटर इतकी झाली आहे. नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी, औषधे, आदी सुविधा पुरविण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. वाराणसीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने गंगा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर पूरग्रस्त भागाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याचबरोबर आसपासच्या परिसरातही पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी परिस्थिती आणखी बिकट झाली. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.