Uttarakhand Rain
Uttarakhand Rain

Uttarakhand Rain : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; महाराष्ट्रातील 50 पर्यटक बेपत्ता, शोधकार्य सुरू

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Uttarakhand Rain) उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून अनेक घरे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. डोंगर उतार खचल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 50 पर्यटक बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बेपत्ता झालेल्यांमध्ये पुण्यातील आंबेगाव परिसरातील 23 पर्यटकांचा समावेश आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील 19 नागरिक आणि नांदेड जिल्ह्यातील 10 नागरिक देखील बेपत्ता आहेत. या नागरिकांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बचाव कार्य करणाऱ्या पथकांसमोर उभं राहिलं आहे.

आंबेगाव व अवसरी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने उत्तराखंडात गेले होते. पावसामुळे जलपातळी वाढल्याने हे पर्यटक काही ठिकाणी आडोशाला थांबले होते. यामुळे त्यांचे मोबाईल फोन बंद झाले असून संपर्क होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या पर्यटकांनी काही वेळा अगोदर मोबाईलद्वारे फोटो आणि संदेश पाठवून सुखरूप असल्याची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्याची माहिती मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील 13 नागरिकांशी अद्याप संपर्क झाला नाही. तसेच पाचोरा तालुक्यातील दोघे जणही बेपत्ता आहेत. संपूर्ण परिस्थितीकडे पाहता बेपत्ता नागरिकांपैकी अनेकजण सुरक्षित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उत्तराखंड प्रशासन, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन दल आणि महाराष्ट्र सरकारचे बचाव पथक शोधकार्य युद्धपातळीवर राबवत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com