Uttarakhand : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर; अनेक घरांचे नुकसान
(Uttarakhand) उत्तराखंडातील देवभूमी उत्तरकाशीमध्ये मंगळवारी जोरदार ढगफुटी आणि भूस्खलन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धराली गावात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत मुसळधार पावसामुळे खीरगंगा नदीला अचानक पूर आला आणि अनेक घरे, इमारती वाहून गेल्या किंवा मातीखाली गाडल्या गेल्या.
या दुर्घटनेमुळे धराली गावात जमीन सरकण्याच्या अनेक घटना घडल्या असून, रस्ते बंद झाले आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवण्यात येत आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील 11 यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली होती. ही बाब समजताच प्रशासन सतर्क झाले. सुदैवाने हे सर्व यात्रेकरू घटनास्थळापासून सुमारे 150 किमी दूर ठिकाणी असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उत्तराखंडमध्ये नांदेड जिल्ह्यातील इतर कोणतेही नागरिक अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तहसीलदार किंवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
उत्तरकाशी आणि परिसरात हवामानाची स्थिती अजूनही चिंताजनक असून, आणखी ढगफुटी किंवा भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि आपत्कालीन मदतीचे प्रयत्न सुरू असून, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे स्थलांतरही युद्धपातळीवर सुरू आहे.