MNS Vs BJP : अनेक वेळा रखडलेला पक्षप्रवेश अखेर पूर्ण! मनसेनं दूर लोटलेल्या नेत्याच भाजपमध्ये स्वागत
खेड तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या वैभव खेडेकर यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाला अखेर आज शिक्कामोर्तब झाले. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडेकर यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला.
वैभव खेडेकर हे आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह मोठ्या उत्साहात मुंबईत दाखल झाले होते. याआधी दोनदा नियोजित पक्षप्रवेश कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक राजकारणात आणि खेड तालुक्यात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र, आजचा दिवस हा खेडेकर यांच्या राजकीय प्रवासात महत्त्वाचा टप्पा ठरला.
मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर खेडेकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांचा भाजप प्रवेश हा केवळ एक वैयक्तिक निर्णय नसून, खेड तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपसाठी बळकटी करणारा निर्णय मानला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, खेडेकर यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असून, विशेषतः ग्रामीण भागात भाजपची घुसखोरी अधिक दृढ होऊ शकते.
पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना खेडेकर यांनी सांगितले की, "भाजपची राष्ट्रहिताची भूमिका, विकासाभिमुख कार्यपद्धती आणि मजबूत संघटनात्मक ताकद पाहता मी हा निर्णय घेतला आहे. पक्ष जो जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन."
दरम्यान, खेड शहरात आणि तालुक्यात खेडेकर यांच्या भाजप प्रवेशावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आता खेडेकर यांना भाजपकडून कोणती भूमिका दिली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यांच्या राजकीय रणनीतीमुळे खेड तालुक्यात आगामी काळात नवे राजकीय समीकरण तयार होणार हे निश्चित आहे.