Vaibhav Naik on Rajan Salvi:राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर वैभव नाईकांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, "आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहू..."

राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत वैभव नाईक यांनी केले भाष्य
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी 12 फेब्रुवारी रोजी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आज ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. राजन साळवी यांच्या राजीनाम्यामुळे अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली होती. अशातच आता कुडाळ मालवण मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राजन साळवी यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

वैभव नाईक म्हणाले की, "राजन साळवी पक्ष सोडत असताना मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. राजन साळवी हे सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये आहेत . तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहा. आज वेळ वाईट असली तरीही पुन्हा आपली वेळ येईल. आपण पुन्हा कार्यकर्त्यांना उभं करुया. तुमच्यासारखे कार्यकर्ते हे सत्ता आणि पदासाठी कधीच नव्हते आणि यापुढे देखील नसणार आहेत".

पुढे ते म्हणाले की, "राजन साळवी यांनी मला सांगितले की पक्षातल्या लोकांवर माझा विश्वास राहिला नाही. मी विधान परिषदेला मतदानच केले नाही असे पक्षातील इतर लोकांचे म्हणणे आहे. परंतु यासंदर्भात राजन साळवी यांनी पक्षातील वारिष्ठांकडे तक्रार दिली. त्यांच्याबद्दल त्यांनी कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी सामान्य शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार आहे", असं वैभव नाईक म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com