Vantara Pressnote On Madhuri : 'कोर्टाच्या मान्यतेनुसार सहाय्य करणार'; वनताराची 'माधुरी'बाबत प्रेसनोट
नांदणी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील जैन मठात अनेक दशकांपासून रहिवासी असलेली माधुरी हत्तीण ही धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या कोल्हापूर आणि परिसरातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. स्थानिक जैन समुदायाच्या परंपरेचा ती एक अविभाज्य भाग बनली आहे. तिच्याबाबत असलेली आपुलकी, श्रद्धा आणि प्रेम हे गेल्या काही महिन्यांतील जनआंदोलनातून प्रकर्षाने दिसून आले आहे.
मात्र, काही काळपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माधुरीला उत्तर भारतातील एक अधिकृत वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले. मुख्यमंत्री रवींद्र फडवणीस यांनी सुद्धा काही वेळापूर्वी या संदर्भात ग्वाही दिली आहे. ह्या प्रक्रियेमध्ये वनतारा (Vantara) संस्थेची भूमिका फक्त आणि फक्त न्यायालयीन आदेशानुसार माधुरीची काळजी घेण्यापुरती मर्यादित होती. याच पार्श्वभूमीवर समाजात गैरसमज पसरू नयेत, यासाठी वनताराने हे अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे.
वनताराने स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांनी माधुरीच्या स्थलांतराची कोणतीही शिफारस केलेली नाही, ना तशी प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यांची भूमिका केवळ एक स्वतंत्र बचाव व पुनर्वसन केंद्र चालवणाऱ्या संस्थेची असून, न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार माधुरीच्या दैनंदिन देखभाल, पशुवैद्यकीय उपचार व निवास व्यवस्थेची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. धार्मिक भावना किंवा प्रथांमध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, नाही आणि पुढेही राहणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे, वनतारा कायदेशीर वर्तन, प्राणी कल्याण आणि स्थानिक समुदायाशी सहकार्य या मूल्यांशी बांधिल आहे. माधुरीला पुन्हा कोल्हापूरात आणण्यासाठी मठ व महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला वनतारा पूर्ण पाठिंबा देत आहे. न्यायालयीन मान्यतेनंतर माधुरीच्या सन्माननीय आणि सुरक्षित पुनर्प्रवेशासाठी आवश्यक तांत्रिक व पशुवैद्यकीय सहाय्य वनताराकडून पुरवले जाईल. तसेच, वनताराने पुढाकार घेत मठ व राज्य शासनाशी समन्वय साधून नांदणी परिसरात माधुरीसाठी एक आधुनिक, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या केंद्रात पुढील सुविधा उपलब्ध असतील:
हायड्रोथेरपी तलाव व स्वतंत्र पोहण्याचे तळे
लेसर थेरपी आणि उपचार कक्ष
मोकळ्या जागेत साखळीविना मुक्त हालचाल
रात्रीच्या निवासाची सुरक्षित सोय
नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना
रबराइज्ड फ्लोअरिंग आणि मऊ वाळूचे विश्रांतीस्थळ
या सुविधेची जागा मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी व महाराष्ट्र शासन यांच्या सल्ल्याने निश्चित केली जाईल. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनताराचे तज्ज्ञ हे केंद्र उभारतील. हा प्रस्ताव केवळ शिफारसीचा असून, वनताराला यामधून कोणतेही श्रेय किंवा वैयक्तिक हित अपेक्षित नाही. मठाकडून मांडल्या जाणाऱ्या कोणत्याही पर्यायी प्रस्तावालाही वनतारा सहकार्य करण्यास तयार आहे.
अखेर, वनताराचा सहभाग न्यायालयीन आदेशापुरता मर्यादित असला तरी, यामुळे जर कोल्हापुरातील जैन समुदाय किंवा नागरिकांच्या भावना दुखावल्या असतील, तर वनतारा मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. "मिच्छामी दुक्कडम" — आमच्या कृती, शब्द, किंवा निर्णयामुळे कोणाला त्रास झाला असल्यास आम्ही क्षमायाचना करतो. आपण सर्वांनी माधुरीवरील प्रेमाच्या आधारे एकजुटीने पुढे यावे, यासाठीच वनताराचा हा प्रयत्न आहे. हे प्रसिद्धीपत्रक माधुरीच्या स्थलांतरामागील वस्तुस्थिती स्पष्ट करत असून, वनताराचा भूमिका काय होती, ती कोणत्या मर्यादेत होती, आणि पुढे माधुरीच्या पुनर्वसनासाठी वनतारा कोणती तांत्रिक व व्यावसायिक मदत करू इच्छितो, याचे सविस्तर स्पष्टीकरण या पत्रकात देण्यात आले आहे.