महापारेषणच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत वाशी परिमंडलाचे भू-भू नाटक प्रथम
लक्ष्मीकांत घोणसेपाटील|रत्नागिरी: महापारेषणच्या कराड परिमंडलाने आयोजिलेल्या आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत वाशी परिमंडलाच्या भू-भू या नाटकाने प्रथम क्रमांक तर व्दितीय क्रमांक सांघिक कार्यालय, मुंबईच्या `द आऊट बर्स्ट` या नाटकाने पटकावला. वाशी परिमंडलाचे मंगेश कुलकर्णी उत्कृष्ट अभिनेता आणि हर्षदा वाघमारेला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
कराड (जि.सातारा) येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टाऊन हॉल) येथे महापारेषण कंपनीच्या राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत विविध विषयांवर आठ नाटके सादर केली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महापारेषणचे संचालक (संचलन) श्री. अनिल कोलप, कार्यकारी संचालक (राज्य भार प्रेषण केंद्र) श्री. श्रीकांत जलतारे, मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) श्री. सुधीर वानखेडे, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. जयंत विके, कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता सौ. शिल्पा कुंभार, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सतिश अणे, औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रंगनाथ चव्हाण, मुख्य अभियंता (स्थापत्य) श्री. भूषण बल्लाळ, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी तथा मुख्य समन्वयक श्री. भरत पाटील, नाट्यसचिव श्री. चिदाप्पा कोळी उपस्थित होते.
यावेळी श्री. दिनेश वाघमारे म्हणाले,``स्पर्धेत समाजप्रबोधन, चुकीच्या चालीरिती, पर्यावरण अशा विविध विषयांची मांडणी करणारी नाटके होती. त्यामुळे या सर्वच नाटकातील कलाकारांचे मी अभिनंदन करतो. तसेच ज्यांना पारितोषिक मिळाले, त्यांनी याहीपेक्षा सुंदर काम करण्यासाठी प्रयत्न करावेत तर ज्यांना पारितोषिक मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुढील वर्षी जोरात तयारी करून आपली कला सादर करावी. महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी 24x7 काम करतात. कोविड काळात कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा केला. विशेषतः रूग्णालये व अत्यावश्यक सेवेचा वीजपुरवठा कायम सुरळीत ठेवला. तौक्ते व निसर्ग चक्रीवादळातही कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केले. महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून ड्रोनचा वापर, मंकी पेट्रोलिंग, उपकेंद्राचा रिमोट कंट्रोलने वापर, ऑप्टीकल वायरचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे महापारेषणला विविध पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.``
या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून योगिनी कुलकर्णी (स्पर्श), नुरी पाल (भू-भू), चेतन तांबोळी (तीस तेरा), प्रताप भोसले (लाली), सुशील काळे (जननी जन्मभूमी), अरुंधती जगताप (वैशाली कॉटेज), शशिकांत इंगळे (दीपज्योती), सुशील घाडगे (द आऊट बर्स्ट) म्हणून गौरविण्यात आले. बालकलाकार म्हणून रुद्राक्ष खैरे व भार्गव जोशी, सांघिक कार्यालय, मुंबई व शर्वरी, नागपूर परिमंडल यांना गौरविण्यात आले.
रंगभूषा/वेषभूषा पुरस्कारासाठी जननी जन्मभूमीने प्रथम तर तीस तेरा नाटकाने व्दितीय क्रमांक पटकाविला. संगीत पुरस्कारासाठी `द आऊट बर्स्ट`ने प्रथम तर भू-भू नाटकाने व्दितीय क्रमांक पटकाविला. प्रकाश योजनेसाठी प्रथम पुरस्कारात `द आऊट बर्स्ट`ने तर व्दितीय स्पर्श नाटकाने बाजी मारली. नेपथ्यसाठी दीपज्योती नाटकाने प्रथम तर स्पर्श नाटकाने व्दितीय क्रमांक मिळविला.
अभिनय (पुरुष) साठी भू-भू नाटकासाठी मंगेश कुलकर्णीने प्रथम तर `द आऊट बर्स्ट`च्या मधुर बोरकरने व्दितीय क्रमांक पटकाविला. अभिनय (स्त्री) साठी
भू-भू नाटकातील हर्षदा वाघमारेने प्रथम तर वैशाली कॉटेज नाटकासाठी स्नेहल दरवडेने व्दितीय क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी प्रथम क्रमांक वाशीच्या भू-भू नाटकाने पटकाविला तर सांघिक कार्यालयाच्या द आऊट बर्स्ट नाटकाने व्दितीय क्रमांक पटकाविला. निर्मिती/नाटकासाठी वाशी परिमंडलाच्या भू-भू नाटकाने प्रथम तर सांघिक कार्यालय, मुंबईच्या `द आऊट बर्स्ट`ने व्दितीय पुरस्कार मिळविला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. मुकुंद पटवर्धन, माधुरी दातार व नरेंद्र आमले यांनी काम पाहिले. यावेळी सांघिक कार्यालय, मुंबईतून महाव्यवस्थापक (मा.सं.मनुष्यबळ नियोजन) श्री. राजू गायकवाड, महाव्यवस्थापक (मा.सं. आस्थापना) श्री. मंगेश शिंदे, राजशिष्टाचार अधिकारी श्री. सतिश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता सौ. शिल्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता श्री. चिदाप्पा कोळी, अधीक्षक अभियंता श्री. प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) श्री. अतुल मणूरकर, अधीक्षक अभियंता (प्रभारी) श्री. अभिजीत धमाले, सहाय्यक महाव्यवस्थापक (विवले) श्री.राजेश केळवकर व सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) (प्रभारी) श्री. राजू कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व सदानंद गौड यांनी केले.