“गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
फडणवीस मुंबईत लघु उद्योग भारतीच्या प्रदेश अधिवेशनात बोलत असताना म्हणाले की, “गुजरातमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय आमचं सरकार येण्याच्या अगोदर झालेला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर तो प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी निकराचा प्रयत्न केला. मात्र ज्यांनी काहीच केलं नाही, ते आता आमच्याकडे बोट दाखवतायत, ते आम्हाला शहापण शिकवतायत. अरे तुमचं कर्तृत्व काय ते तरी सांगा. तुम्ही काय केलं हे तरी सांगा. मूळात काही केलंच नाही आणि आम्हाला शहाणपण सांगताय.”
यासोबतच ते म्हणाले की, “मी सांगू इच्छितो विरोधकांच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेलं नाही तर बघा, निश्चतपणे नेणार. ही चांगली स्पर्धा आहे, गुजरात काय पाकिस्तान थोडीच आहे. आपला लहान भाऊच आहे. आपण एकत्रच होतो, एकाच दिवशी दोन राज्य झालो आहोत. पण शेवटी ही एक चांगली स्पर्धा आहे. आम्हाला गुजरातच्या पुढे जायचं आहे. कर्नाटकाच्या पुढे जायचं आहे आणि सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच राहिला पाहिजे, तो दुसऱ्या स्थानावर आम्ही ठेवूच शकत नाही आणि ते आम्ही करून दाखवू.” असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.