Manoj Kumar : जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ अभिनेते,दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं . देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केलं.
मनोज कुमार यांनी रोटी कपडा और मकान, शहीद, उपकार, पूरब और पश्चिम आणि अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं आहे. हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे सुपरहिट ठरले. 24 जुलै 1937 रोजी मनोज कुमार यांचा जन्म झाला. 'वो कौन थी?' हा मनोज कुमार यांची मुख्य भूमिका असलेला त्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. त्यातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.
त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये 'भारत कुमार' म्हणून ओळख मिळाली. मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. प्रदीर्घ काळापासून मनोज कुमार आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.