"चुकीचा इतिहास आणि काल्पनिक कादंबरीच्या आधारे...", शिर्केंच्या वंशजाचे 'छावा'च्या दिग्दर्शकांवर गंभीर आरोप
अभिनेता विकी कौशलचा 'छावा' चित्रपट सध्या सर्वत्र धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने आजवर 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. सर्वच क्षेत्रातून 'छावा'चं कौतुक होत असतानाच राजेशिर्के कुटुंबाने 'छावा' सिनेमावर आक्षेप घेतला आहे. शिर्केंकया वंशजांनी पत्रकार परिषद घेऊन शिर्केंनाखलनायक दाखवले आहे. ते चुकीचं असून बदलण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.
'छावा' या चित्रपटामध्ये गणोजी राव शिर्के आणि कान्होजी राव शिर्के यांना खलनायक दाखवलं आहे. ते याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, " आम्ही नुकताच 'छावा' चित्रपट पाहिला. यामध्ये खूप चुकीचा इतिहास दाखवला आहे. इतिहासामध्ये बदल करुन अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. कोणताही पुरावा आणि ऐतिहासिक संदर्भ नसताना काल्पनिक कादंबरीच्या आधारे या चित्रपटामध्ये आमच्या राजेशिर्के कुटुंबाची बदनामी केली आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत".
पुढे राजेशिर्के म्हणाले की, "आम्ही दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना, 'छावा'चे लेखक आता हयात नाहीत पण प्रकाशकांना कायदेशीर नोटिस पाठवू. आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही शिवजयंतीमुळे थांबलो होतो. चांगल्या कामात आणि शिवाजी महाराजांचा उत्साह साजरा करताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही शिवजयंतीनंतर पत्रकार परिषद घेतली".
मागणी काय आहे?
दीपक राजे शिर्के म्हणाले की, "आमची एकच मागणी आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह आणि राजेशिर्के कुटुंबाची बदनामी होत असलेले सर्व प्रसंग बदलण्यात यावेत आणि चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात यावा. सर्व चित्रपट चांगला आहे, पण त्यातील खलनायक चुकीचा दाखवला आहे. मी उतेकरांना विनंती करतो की या चित्रपटामध्ये बदल करावा अन्यथा तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच आम्ही तुमच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावादेखील आम्ही दाखल करणार आहोत".