Beed : छेडछाडीला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, लग्नाच्याच दिवशी घेतला गळफास; पीडितेची आई न्यायाच्या प्रतिक्षेत
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि पोलीस यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे एका स्वप्नाळू तरुणीने आपल्या आयुष्याचा अंत केला. साक्षी कांबळे नावाच्या या तरुणीने मामाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अभिषेक कदम याला अटक करण्यात आली होती. परंतु त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
आईचे उपमुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
साक्षीच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. त्या पत्रात लिहिले आहे की, "साहेब, तुम्ही 'लाडकी बहीण' म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिला, पण माझ्या लेकीला न्याय कोण देणार?. साक्षी हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न पाहत होती, पण काही नराधमांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, ब्लॅकमेल केलं आणि तिचे अश्लील फोटो-व्हिडिओ काढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. या प्रकरणात आरोपीची बहीण पोलीस खात्यात कार्यरत असल्याने पोलिसांनी यामध्ये दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही साक्षीच्या कुटुंबाने केला आहे."
आरोपींचे गुंडांशी संबंध?
साक्षी ज्या KSK महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तिथेच याआधी दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपींचे स्थानिक गुंडांशी संबंध असून, त्यामुळे अनेक पीडित मुलींचे पालक पुढे येण्यास धजावत नाहीत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील
साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे थेट आवाहन करत लिहिले की, "साहेब, तुमच्याकडूनच आता आम्हाला न्यायाची आस आहे. अन्यथा या व्यवस्थेवर आमचा विश्वासच उरलेला नाही."
"लग्नाआधीच संपलं लेकीचं आयुष्य..."
साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात आणि माध्यमांशी बोलताना आक्रोश केला आहे. त्या म्हणाल्या, "आज माझ्या मुलीचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या दिवशीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे माझी लेक कायमची गेली."
अभिषेक कदमवर मोक्का लावा
"या टोळीने माझ्या लेकीला मारलं आहे. अभिषेक कदमवर 'मोक्का' (MCOCA) लावा आणि त्याला कायमचा जेलमध्ये टाका. अशी राक्षसी मानसिकता ठेवणाऱ्यांना समाजात मोकळं फिरण्याचा अधिकार नाही," असा संतप्त आरोप आणि मागणी साक्षीच्या आईने केली आहे.
पोलीस यंत्रणेवरही गंभीर आरोप
साक्षीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेचा आरोप केला आहे. "आरोपीची बहीण पोलीस दलात असल्याने आमच्यावर दबाव आणला गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमचं कार्यालयाबाहेर ताटकळणं दिसतं. तरीही कारवाई झाली नाही. पोलिसच जर साथ देत नसतील, तर आम्ही कोणाकडे दाद मागायची?", असा सवाल पीडित कुटुंबाने केला आहे.