Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला चेहरा वापरून सायबर गुन्हेगारांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका माजी अधिकाऱ्याची तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी विश्वास नांगरे पाटील यांचा एआयद्वारे तयार केलेला चेहरा वापरून व्हिडिओ कॉल केला. या कॉलमध्ये त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती दिली. हे व्यवहार अब्दुल सलाम नावाच्या दहशतवाद्याशी संबंधित असल्याचे सांगत, त्यांच्या खात्यात 20 लाख रुपये जमा झाल्याची बतावणी केली.
त्यानंतर, याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगत, संबंधित माजी अधिकाऱ्याला अटकेची भीती दाखवली. त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून टप्प्याटप्प्याने एकूण 78 लाख 60 हजार रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माजी अधिकाऱ्यांनी तात्काळ क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या बनावट कॉल्सना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद कॉल्स किंवा मेसेज आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.