'टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय' मुंबईच्या तुंबईवरुन वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

'टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय' मुंबईच्या तुंबईवरुन वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. रात्रीपासूनच मुंबईतील पावसाने जोर धरला आहे.
Published by :
shweta walge

मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. रात्रीपासूनच मुंबईतील पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे. तसेच काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे, रेल्वे आणि एसटी, बसेस सेवांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे. रात्रभरात तब्बल 300 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने ही दाणादाण उडाल्याचं समोर आलं आहे. यावरुनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईच्या तिजोरीची लुट करणाऱ्या आणि डाका टाकणाऱ्यांमुळे ही परिस्थिती आहे. 300 मिमीमध्ये अशी परिस्थिती होत असेल तर काय? अनेक कामं राहिली होती. त्यांना कामे करता आली नाहीत. टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय. मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहे. सरकारच्या परतीचा प्रवास आता सुरु झालाय. सरकारला व्यवस्थापन जमत नाही, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आमदारांना बसला आहे. अधिवेशनसाठी अनेक आमदार एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येत होते. पण, जोरदार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. राज्याचे मदत आणि आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला. यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

ते म्हणाले की, मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय होणार? हे सरकार काहीच करु शकत नाही. अपयशी सरकार अशी ओळख निर्माण झाली असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com