मुलीच्या विधानावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याविरोधात भाजपाने आक्रमक होत सावरकर गौरव यात्राही काढली होती. तर, उध्दव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिला होता. हे वातावरण शांत होता न होताच पुन्हा एकदा काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावरकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकाविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता एका माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, एका पुस्तकाचा दाखला घेऊन ती बोलली असेल, तर त्याचा खुलासा ती करेल. तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ ती सांगत होती. त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. ती स्वत: वकील आहे. प्रत्येकानेच माफी मागायची असेल, तर अनेकांनी माफी मागायला हवी होती. असे वडेट्टीवार म्हणाले.