नाना पटोले, संजय राऊत यांचे नाव घेत विजय वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर; म्हणाले...
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पराभवावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन नेते त्याठिकाणी होते. त्यामध्ये आम्हीही होतो. परंतु जागावाटपाचा तिढा जर दोन दिवसांत संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडलं असते.
आम्ही कुठलही प्लॅनिंग करु शकलो नाही. आम्हाला कुठलही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तिनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारणे झाली. त्यामुळे मला वाटते. हे मुख्य कारण आहे जागावाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, वाया घालवलेला वेळ हे प्लॅनिंग आहे का? बैठकीची वेळ 11 वाजता आणि यायचे 2 वाजता. अनेक नेते उशिरा येत होते. त्यामध्ये मी कुणाचे नाव घेणार नाही. त्यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीच्या जागांचा घोळ 2 दिवसांत संपला असता तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता. जागावाटपात वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र, प्लॅनिंग होतं का? अशी शंका घेण्यास हरकत नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.