Vijay Wadettiwar : "हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे"

Vijay Wadettiwar : "हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे"

देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Published on

देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचे आज स्पष्ट दिसले. हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे आहे. आजच्या अर्थसंकलपात बिहार राज्यासाठी विविध घोषणांचा वर्षाव करण्यात आला. तिथून सरकारला टेकू मिळत असल्याने आणि येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने बिहारला झुकते माप मिळाले. पण यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्र हे राज्य केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देत असताना महाराष्ट्रावर वारंवार अन्याय करण्यात येत आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. पण यातून शेतकरी, तरुण ,महिला, सामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण असा कोणताही दिलासा आज मिळाला नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी बियाणे, पीकविमा याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. तसेच आज देशात रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असताना रोजगारासाठी, तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने मांडले नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मेट्रो , रेल्वे साठी निधी दिला असे सत्ताधारी सांगत असतील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद या अर्थसंकलपात करण्यात आलेली नाही. मध्यमवर्गीय टॅक्स मुळे त्रासले होते, केंद्र सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे त्यासाठी टॅक्स मध्ये सूट देण्यात आली. त्यामुळे हे बनवा बनवी बजेट असल्याची भावना आज जनतेत आहे. मेक इन इंडियाची नुसती घोषणा झाली पण त्यातून हाती काही लागले नाही त्यामुळे नॅशनल मॅन्यूफॅक्चरींग हे नवीन मिशन आणले आहे,म्हणजे नवीन बाटलीत जुनेच औषध पुन्हा देण्यात येत आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com