Pune Election : पुणे महापालिकेच्या 163 जागांसाठी आज मतदान, 1,155 उमेदवार रिंगणात
पुणे महानगरपालिकेतील 163 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळपासूनच पुणे शहरात मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत असून, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. शहराच्या कारभाराची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला आज मतदार करणार आहेत. पुणे महानगरपालिकेसाठी एकूण 41 प्रभाग असून, प्रत्यक्ष निवडणूक 165 जागांसाठी होत आहे. त्यापैकी 163 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी तब्बल 1 हजार 155 उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह स्थानिक आघाड्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी पुणे महापालिका प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. शहरभरात 4 हजार 11 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, प्रत्येक केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी स्वतंत्र कक्ष, मतदार यादी, ओळख तपासणी आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स आणि त्वरित प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर सतत नजर ठेवली जात आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची नांदी मानली जात आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार सभा, रॅली आणि प्रचार फेऱ्यांमुळे राजकीय वातावरण तापले होते. आजचा मतदारांचा कौल पुण्याच्या विकासाच्या दिशेला नवी वाट दाखवणार असून, उद्या होणाऱ्या मतमोजणीतून पुणे महानगरपालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरत आहे.
