Municipal Election 2026 : १५ जानेवारीला मतदान; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Municipal Election 2026 : १५ जानेवारीला मतदान; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांचा अंतिम टप्पा जवळ आला असून, आज सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा शांत होणार आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

Municipal Election 2026 अंतर्गत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांचा अंतिम टप्पा जवळ आला असून, आज सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा शांत होणार आहेत. निवडणूक नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार थांबवणे बंधनकारक असल्याने सर्व पक्षांनी जोरदार प्रचाराला पूर्णविराम दिला आहे. या २९ महानगरपालिकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शुक्रवार, १६ जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), नागपूर महानगरपालिका (NMC) यांच्यासह सर्व महानगरपालिकांमध्ये मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० अशी निश्चित करण्यात आली आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यंदा प्रभागरचनेत बदल झाल्याने मतदान प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

मतदान प्रक्रिया कशी असेल?

मतदारांच्या सोयीसाठी मतदान प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. सर्वप्रथम मतदान केंद्रावरील अधिकारी मतदार यादीतील नाव आणि ओळखपत्राची पडताळणी करतील. त्यानंतर मतदाराच्या बोटाला अमिट शाई लावली जाईल आणि फॉर्म १७अ वर स्वाक्षरी घेतली जाईल. पुढील टप्प्यात मतदाराला स्लिप देण्यात येईल. शेवटी मतदान कक्षात जाऊन ईव्हीएमवर पसंतीच्या उमेदवाराचे बटण दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटवर उमेदवाराचे नाव व चिन्ह ७ सेकंदांसाठी दिसेल, ज्यामुळे मत नोंद झाल्याची खात्री होईल.

मतदान दिवशीचे नियम

मतदान केंद्रांवर मोबाईल फोन, कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास सक्त मनाई आहे. मतदारांनी ईपीआयसी कार्ड किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेले वैध ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. मार्च २०२२ पासून बीएमसीमध्ये प्रशासक राजवट असल्याने ही निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

१५ जानेवारी सार्वजनिक सुट्टी

राज्य सरकारने मतदानाच्या दिवशी संबंधित २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी केवळ निवडणूक होणाऱ्या शहरांपुरती मर्यादित असेल. या दिवशी राज्य व केंद्र सरकारी कार्यालये, तसेच बहुतांश शाळा व महाविद्यालये बंद राहणार आहेत, कारण अनेक शैक्षणिक संस्था मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), सोलापूर, कोल्हापूर, सांगली यांसह एकूण २९ शहरांमध्ये मतदान पार पडणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com