Weather Update : 'या' राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रामध्ये काय स्थिती?
थोडक्यात
- या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा 
- महाराष्ट्रामध्ये काय स्थिती? 
- मराठवाड्यातही पावसाचा इशारा 
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. मोथा चक्रीवादळाचा प्रभाव हळुहळु कमी होत आहे. मात्र त्यामुळे आता पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज पूर्वोत्तर राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा या राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतात या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये या काळात ढगाळ वातावरण राहणार असून, मधून मधून पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रामध्ये काय स्थिती?
दरम्यान महाराष्ट्रात पुढील एक ते दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, राज्यातील अनेक भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला असून, राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पवासाची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट असून या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या चार जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातही पावसाचा इशारा
गेल्या काही महिन्यांमध्ये मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात यंदा सर्वाधिक पाऊस हा मराठवाड्यात झाला आहे, पावसामुळे मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे, मात्र अजूनही पाऊस पाठ सोडायला तयार नाहीये, पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


