दुष्काळाचे सावट गडद : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत 83 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाच्या विळख्यात सापडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या तीन जिल्ह्यांतील अनेक गावे व वाड्यांना जीवनावश्यक पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एकूण 57 गावे आणि 11 वाड्यांमध्ये सध्या 83 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिस्थिती अधिक गंभीर आहे. येथे 8 गावे व 5 वाड्यांना एकूण 12 टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. फुलंब्री तालुक्यातील एका गावात 2 टँकर, पैठणमधील 11 गावांमध्ये 11 टँकर, वैजापूरमधील 15 गावे व 1 वाडीत 16 टँकर तर गंगापूर तालुक्यातील 7 तहानलेल्या गावांना 10 टँकरद्वारे पाणी मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर आणि माहूर तालुक्यांतील प्रत्येकी एका गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील परिस्थितीही चिंताजनक आहे. एकूण 13 गावे व 5 वाड्यांमध्ये 30 टँकर फिरत आहेत. त्यात जालना तालुक्यातील 3 गावे व २ वाड्यांना 12 टँकर, बदनापूर तालुक्यातील 6 गावे व 3 वाड्यांना 12 टँकर तर अंबड तालुक्यातील 4 गावांना 6 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.
हे चित्र केवळ पाण्याच्या टंचाईचे नव्हे, तर शासनाच्या दीर्घकालीन पाणी व्यवस्थापनातील अपयशाचेही आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे संकट ओढवते, टँकरचा गोंधळ होतो आणि गावे तहानलेली राहतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी तात्काळ आणि ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, शाश्वत पाणीपुरवठा योजना यावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे. दुष्काळ हे नुसते हवामानाचे संकट नाही, तर नियोजन शून्यतेचेही द्योतक आहे. त्यामुळे केवळ टँकरपुरते उपाय न करता दीर्घकालीन उपाययोजना हाती घेऊन मराठवाड्याला या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी शासनावर आहे.