गटारे बुजविल्याने घरात पाणी शिरलं, केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष
अमझद खान | कल्याण : सोमवारपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाचा फटका कल्याण पश्चिमेतील ठाणकरपाडा नागरिकांना बसला आहे. पावसाचे पाणी चाळीतील घरात शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील रस्त्यालगत असलेली गटारे बुजविली गेली आहेत. त्याकडे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पाणी घरात शिरले असल्याचा आरोप आरोप शिवसेनेचे स्थानिक माजिक नगरसेवक मोहन उगले यांनी केला आहे.
नागेश्वर चाळीत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना घरातील सुपली घेऊन पाणी बाहेर काढण्याची वेळ आली. तसेच, चाळीतील गल्ली बोळात पाणी शिरले आहे. यामुळे चाळीतील नागरिकांना घरातील जीवनाश्यक वस्तू खाटेवर ठेवण्याची वेळ आली. हा प्रकार कळताच स्थानिक माजी नगरसेवक उगले यांनी धाव घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी नागरिकांची व्यथा जाणून घेतली. तसेच, या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साचलेले पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली.
स्थानिक रहिवासील दीपिका ठक्कर यांनी सांगितले की, त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरच्या मंडळींसह चाळीतील अन्य लोकांनाही त्रास झाला. इतकेच नाही तर चाळीतील ड्रेनेजही पावसाच्या पाण्याने तुंबले आहे. त्यामुळे घरातील शौचालातून घाण पाणी वरती येत असल्याची समस्याही उद्भवली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.